
पौष्टिक खाद्यपदार्थ, नाविन्यपूर्ण पाककृती आणि संतुलित आहाराच्या संदेशातून विद्यार्थ्यांनी केली पोषणविषयक जनजागृती !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (G.N.M.), बेल्हे येथे विद्यार्थ्यांमध्ये पोषणशास्त्राविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयोजित ‘NOURISH 2026 – Nutrition Day Program’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ यांनी दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस आहार, पोषणमूल्ये, आहारातील विविध घटकांचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी व्यावहारिक माहिती देण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ताजी फळे, पालेभाज्या, विविध भाज्या, कडधान्ये आणि धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक व नाविन्यपूर्ण पाककृतींचे आकर्षक प्रदर्शन मांडले.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक खाद्यपदार्थातील पोषणमूल्ये, त्यातून शरीराला मिळणारी जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि तंतुमय पदार्थांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. दैनंदिन आहारात फळे, भाज्या, दूध, कडधान्ये आणि इतर सकस पदार्थांचा समावेश केल्याने आरोग्य चांगले राहण्यास कशी मदत होते, याची माहितीही विविध सादरीकरणांतून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या जोरावर खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करत संतुलित आहाराचा संदेश दिला. या प्रदर्शनाचे परीक्षण कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. अनिल कपिले, समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, समर्थ जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर समर्थ लॉ कॉलेजचे प्रा.शिवाजी कुमकर डॉ. रमेश पाडेकर समर्थ नर्सिंग चे प्राचार्य डॉ.भुतकर यांनी केले.आकर्षक सादरीकरण, नावीन्यपूर्ण पाककृती आणि पोषणविषयक माहिती यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून पोषणशास्त्र समजून घेण्याची संधी मिळाली.
नर्सिंग शिक्षणामध्ये रुग्णसेवेबरोबरच आरोग्यसंवर्धन आणि रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रुग्णांना योग्य आहाराचे मार्गदर्शन करणे, विविध आजारांमध्ये आहाराचे महत्त्व समजावून सांगणे आणि समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे ही नर्सिंग विद्यार्थ्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून ‘NOURISH 2026’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानवृद्धीसह व्यावसायिक कौशल्य विकासासाठीही उपयुक्त ठरला.
या कार्यक्रमासाठी प्रा. हर्षदा गोफणे, प्रा. आयेशा जमादार, प्रा. सानिया शेख, प्रा. उज्वला साळवे आणि प्रा. स्नेहल येवले यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


