
सात निकष पूर्ण केल्यास सेविकांना १,४००, तर मदतनीसांना ७०० रुपये; सर्व दहा निकष पूर्ण केल्यास मिळणार अधिक भत्ता
पंचनामा प्रतिनिधी मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महिला व बालविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनीसांना दरमहा दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, आता अधिकाधिक कर्मचाऱ्यांना या आर्थिक लाभाचा फायदा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. सुधारित निकषांनुसार, अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दरमहा १ हजार ४०० रुपये, तर मदतनीसांना ७०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.
दरम्यान, सर्वच्या सर्व दहा निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांतील सेविकांना दरमहा २ हजार रुपये, तर मदतनीसांना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कामगिरीच्या आधारे आर्थिक प्रोत्साहन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच माता-बाल संगोपन यांसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन अधिकाधिक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळावा आणि कामकाजाला अधिक चालना मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
सुधारित निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


