
पंचनामा प्रतिनिधी – राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट प्रणालीद्वारे ऑनलाइन हयातीचे दाखले सादर करता यावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे यांच्यामार्फत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथे १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत जिल्हा परिषद येथील शरदचंद्र पवार सभागृहात शिबिर होणार आहे. तसेच बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर व परिसरातील निवृत्तीवेतनधारकांसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, बारामती येथील बहुउद्देशीय सभागृहात शिबिर आयोजित केले आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड व परिसरातील निवृत्तीवेतनधारकांसाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथील बहुउद्देशीय सभागृहात शिबिर होणार आहे.

या शिबिरांमध्ये जीवनप्रमाण ऍपद्वारे ऑनलाइन हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरासाठी येताना निवृत्तीवेतनधारकांनी आधार कार्ड, पीपीओ क्रमांक, बँक खातेपुस्तिका आणि मोबाईल सोबत आणावा.

सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन हयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर संबंधितांना डिसेंबर २०२६ चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप हयातीचे दाखले सादर न केलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती गायत्री जाधव यांनी केले आहे.

