सामाजिक

धामणीत खंडोबाला पत्रीपूजा अन् फुलांची आकर्षक आरास !!

1011082628

‘सदानंदाचा येळकोट, जय मल्हार’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला; भाद्रपद पौर्णिमेनिमित्त शेकडो भाविकांची उपस्थिती

पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पत्रीपूजा व फुलांचा आरास सोहळा शनिवारी (दि. २६) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. स्वयंभू सप्तशिवलिंग तसेच खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या पंचधातूच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांना रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात ‘सदानंदाचा येळकोट, जय मल्हार’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पहाटे चार वाजता मंदिरात घंटानाद करण्यात आला. त्यानंतर आठ यजमान जोडप्यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंग तसेच खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या मुखवट्यांना रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर खंडेराय, म्हाळसाई, बाणाई व जोगेश्वरी यांच्या मूर्तींना आकर्षक वस्त्रालंकार करण्यात आले. त्यांना सुगंधी फुलांचे हार अर्पण करण्यात आले.

1011082631

यानंतर देवस्थानचे सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत व अनिरुद्ध वाळुंज यांच्या हस्ते पारंपरिक पत्रीपूजा करण्यात आली. स्वयंभू सप्तशिवलिंग तसेच पंचधातूच्या खंडोबा, म्हाळसाई व बाणाई यांच्या मुखवट्यांना सुगंधी केशर व दवण्याचे अत्तर मिश्रित केलेल्या पत्रीच्या पानांचे लेपन करण्यात आले. या पारंपरिक पूजाविधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

फुलांच्या सजावटीने गाभारा बहरला

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची तसेच फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती. झेंडू, गुलाब व अष्टरच्या फुलांनी सजविलेला गाभारा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. फुलांच्या सुगंधाने आणि दीपप्रज्वलनाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. ही आकर्षक फुलांची सजावट पहाडदऱ्याचे उपसरपंच कैलास वाघ व शरद बँकेचे शाखाधिकारी अनिल आदक यांच्या सौजन्याने करण्यात आली.

पत्रीपूजा व अभिषेकानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. पौर्णिमेच्या अभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले. पहाटे स्वयंभू सप्तशिवलिंगाला पत्री अर्पण केल्यानंतर मंदिरात उपस्थित भाविकांच्या कपाळी भंडारा लावण्यात आला.

पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने धामणीसह पंचक्रोशीतील विविध गावांमधून भाविक कुटुंबासह खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी पारंपरिक पद्धतीने तळी-भंडाराचा विधी करून खंडेरायाचे दर्शन घेतले. ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.

1011082628

आरतीनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर भाविकांची मंदिरात वर्दळ सुरू होती. पारंपरिक पत्रीपूजा, अभिषेक, फुलांची आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे यंदाची भाद्रपद पौर्णिमा धामणीतील खंडोबा मंदिरात विशेष उत्साहात साजरी झाली.

1011080923

Related posts

धामणी (लोणी) च्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

जागतिक रेबीज दिनानिमित्त नाशिक जिल्हा सर्व चिकित्सालयात नाशिक येथे रेबीज प्रतिबंधक शिबिर

Chief Editor

मैत्री म्हणजेच आभाळाला पडलेलं सोनेरी स्वप्न..मैत्री म्हणजेच नवरत्नाच्या हारातील “अनमोल रत्न”..!”

Chief Editor

Leave a Comment