
पंचनामा प्रतिनिधी – नवरात्रोत्सव तोंडावर आला असताना लोणी, धामणी परिसरातील शेतशिवारात झेंडूच्या फुलांना बहर आला आहे. सध्या झेंडूचे पीक काढणीच्या टप्प्यात असून, नवरात्रोत्सवात फुलांची मागणी वाढल्याने चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
झेंडू हे कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि सण-उत्सवांच्या काळात मोठी मागणी असणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून घेतले जाते. लागवडीनंतर साधारण दोन ते अडीच महिन्यांत फुलांची काढणी सुरू होते. योग्य हवामान, पाणी व व्यवस्थापन मिळाल्यास झेंडूचे पीक चांगले उत्पादन देते. दसरा, नवरात्र, दिवाळी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या काळात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. त्यामुळे या कालावधीत बाजारभावात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा असते.
यंदा परिसरात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे परतीचा पाऊस चांगला बरसावा, अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. झेंडू पिकाला सध्या चांगला बहर आला असून, आगामी नवरात्रोत्सवात फुलांना अपेक्षित दर मिळाल्यास उत्पादन खर्च भरून काही प्रमाणात आर्थिक फायदा होईल, अशी आशा उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, परिसरातील बाजरीचे पीक सध्या काढणीयोग्य झाले आहे. तसेच उडीद, मूग आणि चवळी या कडधान्य पिकांचेही उत्पादन चांगले होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, नगदी पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशके तसेच अन्य निविष्ठांच्या दरात वाढ होत आहे. त्या तुलनेत शेतीमालाला मिळणारे उत्पन्न समाधानकारक नसल्याने उत्पादन खर्च वाढत असून, निव्वळ उत्पन्न कमी होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
परतीच्या पावसाची प्रतीक्षा
परिसरातील खरीप पिकांसाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाने साथ दिल्यास उडीद, मूग, चवळी यांसह अन्य पिकांच्या उत्पादनाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवाच्या काळात झेंडूला चांगला बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


