
पंचनामा प्रतिनिधी – सर्वसामान्य लोकांसाठी आशाताई बुचके या मोठा आधार होत्या. लढवय्या, रणरागिनी, नैतिक दरारा हा त्यांचा लौकिक आणि ओळख असली तरी कार्यकर्ते, राजकीय सहकारी, अधिकारी यांच्या बद्दल तेवढाच जिव्हाळा, आणि मन देखील अतिशय हळवं होतं म्हणूनच त्यांचे जाणे सर्वांच्या मनात घर करून राहिले असल्याची कृतज्ञतेची भावना धामणीकर गावकऱ्यांनी व्यक्त केली.
आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे आशाताई बुचके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी धामणी गावच्या पारावर झालेल्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि आठवणींना उजाळा दिला.
गेल्या वीस पंचवीस वर्षात धामणी गावाबरोबर आशाताईंचे नाते अतूट होते. गावच्या विकास कामात त्याचबरोबर व्यक्तिगत नागरिकांच्या मदतीमध्ये त्यांचा पुढाकार होता.धामणीचा खंडोबा हे त्यांचे कुलदैवत त्यामुळे सालाबाद प्रमाणे त्या दर्शनासाठी यायच्या. गावातील अनेक कार्यक्रमांसाठी त्या आवर्जून उपस्थित राहायच्या.
शिवतीर्थ पतसंस्थेचे चेअरमन आणि ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी आशाताईंचा जीवनपट, राजकीय सामाजिक वाटचालीचा उल्लेख करून एका धडाडीच्या आणि सत्तेत नसतानाही विरोधकात राहून ‘सत्ताकेंद्र’ बनलेल्या दुर्मिळ राजकारणी या आशाताई होत्या. असं सांगून त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या. माजी सरपंच सुनील जाधव यांनी आशाताईंच्या लढाऊ बाणा आणि त्यांच्या सर्वव्यापी कामाचा उल्लेख केला. माजी सरपंच अंकुश भूमकर यांनी आशाताईंनी धामणी गावासाठी भांडून दिलेला विकास निधी आणि कामे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. सुभाष नेते जाधव म्हणाले, आशाताई या केवळ व्यक्ती नव्हत्या तर त्या एक प्रेरणा होत्या. जुन्नर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना त्यांची मदत झाली. कर्तुत्वाने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
श्रद्धांजली सभेला माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, उपसरपंच अक्षयराजे विधाटे. आनंदराव जाधव पाटील, मच्छिंद्र अमाप, तानाजी रोडे, श्रीपती विधाटे,गणेश विधाटे मोहम्मद तांबोळी, चिंतामणी जाधव, गडामालक पप्पूशेठ जाधव, खुशाल जाधव, दत्ताआबा जाधव, रोहित भुमकर जाधव,दादाभाऊ जाधव, बळीराम बोराडे, धोंडीभाऊ ससाने, नारायण नवले, स्वप्निल बडेकर ,दगडूभाऊ करंजखेले. प्रसाद विधाटे, यांच्यासह धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशाताई बुचके यांना अभिवादन केले.



