सामाजिक

चिमुकल्यांचे बालपण स्क्रीनच्या कैदेत, खेळण्याच्या वयात वाढतेय मोबाईलचे व्यसन..

fb img 1787625523412

प्रतिनिधी – समीर गोरडे

हातात खेळणी, पुस्तक, रंगपेटी किंवा चेंडू असण्याच्या वयात आज अनेक चिमुकल्यांच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. जेवणासाठी हट्ट करणाऱ्या मुलाला शांत करण्यापासून ते रडणे थांबविण्यापर्यंत आणि काही वेळ पालकांना मोकळीक मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक प्रसंगी मोबाईलचा ‘उपाय’ शोधला जात आहे. सुरुवातीला मनोरंजनाचे साधन वाटणारा हा मोबाईल हळूहळू मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असून, त्याचे रूप व्यसनात बदलत चालल्याची चिंता बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

तंत्रज्ञान हे आधुनिक जीवनाची गरज आहे. शिक्षण, ज्ञान, संवाद आणि माहितीच्या असंख्य संधी डिजिटल माध्यमांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, योग्य वय, योग्य वेळ आणि योग्य मर्यादा यांचा विचार न करता होणारा मोबाईलचा वापर चिमुकल्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर परिणाम करू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या वापराकडे केवळ ‘सवय’ म्हणून न पाहता पालकांनी वेळीच सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे.

मैदानातील खेळ हरवले, स्क्रीनसमोरील तास वाढले –

काही वर्षांपूर्वी संध्याकाळ होताच गल्ली, मैदान आणि अंगणात मुलांचा किलबिलाट ऐकू येत असे. लगोरी, लपंडाव, खो-खो, कबड्डी, क्रिकेट अशा विविध खेळांमध्ये मुले रमलेली दिसत. आज मात्र अनेक घरांमध्ये शाळेतून आल्यानंतर किंवा मोकळा वेळ मिळताच मुलांचा मोर्चा थेट मोबाईल, टॅबलेट किंवा दूरचित्रवाणीच्या स्क्रीनकडे वळतो. गेमिंग, व्हिडीओ, रील्स आणि सोशल मीडियाच्या आकर्षक जगात मुले तासन्तास गुंतून राहत आहेत. मोबाईल हातातून काढून घेतल्यास चिडचिड करणे, रागावणे, रडणे किंवा जेवण न करणे अशा प्रतिक्रिया दिसून येत असल्याचे पालक सांगतात. हीच परिस्थिती पुढे चिंतेचा विषय ठरत असून, मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता अधिक महत्त्वाची ठरत आहे. अनेक घरांमध्ये मुलांना जेवण भरविताना मोबाईलवर व्हिडीओ लावून देण्याची सवय लागली आहे. सतत बदलणारी दृश्ये, गेमिंगमधील उत्तेजना आणि रील्स पाहण्याची सवय मुलांच्या एकाग्रतेवरही परिणाम करू शकते.

तंत्रज्ञानाला विरोध नव्हे; विवेकपूर्ण वापर हवा –

मोबाईल आणि तंत्रज्ञान पूर्णपणे वाईट आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ऑनलाइन शिक्षण, शैक्षणिक माहिती, विविध कौशल्यांचे प्रशिक्षण आणि जगभरातील ज्ञान सहज उपलब्ध करून देण्यात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. मात्र, त्याचा वापर किती आणि कसा करायचा, हे शिकविणे महत्त्वाचे आहे. शाळा आणि पालकांनी यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. डिजिटल शिक्षणासोबत स्क्रीन वापराबाबतचे भान, सायबर सुरक्षितता, योग्य-अयोग्य मजकूर ओळखण्याची क्षमता आणि वेळेचे व्यवस्थापन याबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे.

असे जपा चिमुकल्यांचे बालपण… –

समीर गोरडे-अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती शिंगवे

जेवताना आणि झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा.
मुलांना शांत करण्यासाठी प्रत्येक वेळी मोबाईल देऊ नका.
घरात काही वेळ ‘स्क्रीन फ्री’ ठेवण्याची सवय लावा.
पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा.
दररोज मैदानी खेळासाठी आणि शारीरिक हालचालींसाठी वेळ द्यावा.
वाचन, चित्रकला, संगीत, खेळ आणि इतर छंदांना प्रोत्साहन द्यावे.
मोबाईलचा वापर शिक्षण आणि माहितीपुरता मर्यादित ठेवण्यासाठी स्पष्ट नियम करावेत.
मुलांच्या वर्तनात, झोपेत किंवा दृष्टीत बदल जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


प्रश्न मोबाईलचा नाही, वापराचा
प्राथमिक आरोग्य अधिकारी शिंगवे
डॉ.सुहास मैड

स्क्रीन टाईम वाढल्यामुळे चिमुकल्यांचे जैविक घड्याळ बिघडत आहे. डोळ्यांतील मायोपियाच्या समस्येकडे लहान वयातच वाढ होताना दिसत आहे. ३ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. मुलांनी मैदानात खेळणे आणि घराबाहेर वेळ घालविणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. –


नवनाथ सिनलकर
मुख्याध्यापक जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे
“आई-वडिलांनी स्वतः मुलांसमोर सतत मोबाईल पाहू नये. मुले मोठ्यांचेच अनुकरण करतात. त्यामुळे आज मोबाईल विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. अभ्यासासाठी तो जितका उपयोगी आहे, तितकाच त्याचा अतिवापर घातकही ठरू शकतो. पालकांनी वापराची मर्यादा ठरवून दिली पाहिजे.”

1010908108
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डिजिटल व्यवहारांना नवे बळ-डॉ.शीतल गिरमेसमर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

निरगुडसर विद्यालयातील गणरायाला भावपूर्ण निरोप ; जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह प्रदीप व पूर्वा वळसे पाटील यांनी घेतला विद्यार्थ्यांसोबत लेझीम खेळण्याचा आनंद !!

Chief Editor

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात साजरी !!

Chief Editor

Leave a Comment