
पंचनामा प्रतिनिधी – पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, धामणी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शाळेच्या क्रीडांगणाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
या कामामध्ये प्रथम सुमारे दीड फूट खोदकाम करून दगड व निकृष्ट माती काढून टाकण्यात आली. त्यानंतर नव्याने दर्जेदार मुरूम टाकून संपूर्ण मैदानाचे रोलिंग करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध झाले आहे.
या क्रीडांगणावर विद्यार्थी खो-खो, कबड्डी, धावणे तसेच इतर मैदानी खेळांचा सराव करू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण, शिस्त, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे.

या कामासाठी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब कदम यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच मैदानाच्या कामात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल श्री. नंदू केदारी यांचा आज रोलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थितांनी विद्यार्थ्यांसाठी असे विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. “सुदृढ क्रीडांगण – सक्षम विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य” या ध्येयाने धामणी शाळेने आणखी एक आदर्श उपक्रम साकारला आहे.
पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, धामणीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

