
पंचनामा प्रतिनिधी – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मंगळवार (ता. १५) ते गुरुवार (ता. १७) सप्टेंबर दरम्यान कारखाना कार्यस्थळावर भव्य भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पंचक्रोशीतील भजन मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या भजन स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन मंडळांसाठी येण्या-जाण्याच्या वाहन भाड्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहभागी मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय नगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात आली.
भजन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून या स्पर्धेच्या माध्यमातून भजन कलेला प्रोत्साहन मिळणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भजन मंडळांनी आपली भजने घेऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



