
पंचनामा घोडेगाव प्रतिनिधी – डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणातून घोडनदी पात्रात नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धरणातून पाणी सोडण्यात आल्याने घोडनदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रालगतच्या सखल भागातील शेतीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची अवजारे, कृषी यंत्रसामग्री, खत, बियाणे, पंप, वीज मोटारी तसेच अन्य मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. नदीकाठी बांधलेल्या जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे तसेच नदीपात्रातून कोणत्याही प्रकारचे पाणी उपसणे किंवा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या ग्रामपंचायतींमार्फत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात येत असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी विनाकारण नदीपात्रात प्रवेश करू नये, पूल, बंधारे किंवा नदीकाठावर गर्दी करू नये, लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ ग्रामपंचायत, महसूल विभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


