
शब्दांकन – मा.अनिल बनसोडे
पंचनामा संपादकीय – आजच्या काळात तमाशा फड मालक असणं म्हणजे फक्त नावाला मान… पण वास्तवात मात्र प्रचंड संघर्ष. बाहेरून पाहिलं तर वाटतं फड मालक आहे”, पण त्या नावामागे किती वेदना, किती धावपळ आणि किती अपमान दडलेला आहे, हे फार कमी लोकांना कळतं. एक तमाशा उभा करायचा म्हणजे संपूर्ण संच गोळा करायचा, कलाकार जमवायचे, वादक, कामगार, नृत्यांगना… आणि त्यात सगळ्यात मोठा प्रश्न आज उभा राहिला आहे तो म्हणजे लेबर आणि नृत्यांगनांचा !!
पूर्वीच्या काळात तमाशाला नृत्यांगना कमी पडत नव्हत्या. त्या कलेशी, फडाशी आणि फड मालकाशी एकनिष्ठ असायच्या. पाच-पाच वर्ष त्या एका पार्टीत काम करत राहायच्या. “मिठाला जागणं” हा शब्द फक्त म्हण नव्हती, तर त्या कलाकारांच्या रक्तातच असायचा.
पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे.पूर्वीच्या नृत्यांगनांची पुढची पिढी जागरण-गोंधळ, लावणी शो किंवा इतर कार्यक्रमांकडे वळली आहे.
मनोरंजनाची साधने वाढली आणि तमाशाला कलाकार मिळणं कठीण झालं.नाईलाजाने काही फड मालकांना नागपूरच्या मुलींना तमाशात घ्यावं लागतं. पण त्या मुलींना पारंपारिक तमाशाची गवळण, परंपरा, रीतभात याचं ज्ञान नसतं. त्यामुळे अशा तमाशात रेकॉर्ड गाणी जास्त आणि परंपरा कमी अशी अवस्था होते.काही ठिकाणी पारधी समाजाच्या मुली देखील काम करतात. पण अनेकदा काहीजणी पैसे घेऊन पळून जातात. आणि फड मालकांनी पोलीस तक्रार केली तर उलट धमक्या दिल्या जातात बलात्काराचा खोटा आरोप करू व काही काही फड मालकांच्या मुलावर आरोप सुद्धा केला आहे अशीच भीती दाखवली गेली आहे.मग फड मालकांनी दिलेले पैसे बुडतात, आणि बदनामी मात्र त्यांच्या नावावर येते. ही काळ्या दगडावरची रेघ बनलेली आहे.
नागपूरच्या काही नृत्यांगना ड्रिंक स्मोकिंग व्यसनाच्या आहारी असतात त्या पर डे नाईटवर येतात. रोजचे पैसे द्यावे लागतात. आठ-दहा दिवस पैसे मिळाले की अचानक गायब… आणि वर सोशल मीडियावर पोस्ट पैसे दिले नाहीत, अपमान केला असे आरोप !!
पूर्वी कलाकार आणि फड मालक यांच्यात विश्वासाचा धागा होता.आज मात्र जिथे पैसा जास्त, तिथेच नातं हीच नवी नीती झाली आहे. ज्या फडात व्यसनाला मोकळीक, तिथे कलाकारांची गर्दी !! या सगळ्या संकटाचं एक मोठं कारण म्हणजे तमाशा फड मालकांची एकी नसणे.प्रत्येक फड दुसऱ्याचा पाय ओढण्यातच समाधानी आहे. खेकड्यांसारखं एकमेकांना खाली खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. आजचा तमाशा फड मालक सिजन सुरू झाला की काही जणांचा खेळ सुरू होतो…
कलेची स्पर्धा कमी आणि कलाकार पळवण्याची शर्यत जास्त!
असं करून तमाशा मोठा होत नाही, फक्त मतभेद मोठे होतात. नावाला संघटना आहेत, नावाला अध्यक्ष आहेत… पण निर्णय कुणी घेत नाही.
एखादा कलाकार एका फडातून दुसऱ्यात गेला की, ज्या फडातून आला त्या मालकाची उणी-दुणी काढण्यात समाधान मानलं जातं. दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधणं ही आजची दुर्दैवी मानसिकता झाली आहे.
खरं सांगायचं तर आज महाराष्ट्रात तमाशा जिवंत आहे तो काही हट्टी आणि वेड्या फड मालकांमुळे. जे अजूनही ही लोककला जिवापाड जपत आहेत.पण जर अशीच परिस्थिती राहिली… तर उद्या तमाशा फक्त इतिहासात उरेल आणि आपण सगळे त्याच्या अंत्ययात्रेचे साक्षीदार होऊ.
हा माझ्या मनात साठलेला वेदनेचा साठा… आज शब्दांच्या रूपाने बाहेर आला. तमाशाला शत्रू बाहेर नाही… शत्रू आपलाच व्यवसाय बंधू तंबूत बसलेला आहे.
