
साने गुरुजी
लेखन: बाळासाहेब मेदगे
औदर (राजगुरुनगर)
9324597921
खरा तो एकची धर्म ! जगाला प्रेम अर्पावे !!
या प्रार्थनेने सगळा महाराष्ट्र एके काळी ढवळून निघाला पण या प्रार्थनेचे निर्माते खूप मोठे गुरुजी,साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते,सेवादलाचे सक्रीय कार्यकर्ते होऊन गेले याची तुम्हा आम्हाला माहिती मिळावी म्हणून पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांचा इतिहास मांडण्याची उर्मी आज प्रकर्षाने जाणवत आहे.
साने गुरुजी म्हणजे श्यामची आई आठवते,अमळनेर मध्ये शिकवणारे गुरुजी आठवतात.पण गुरुजी होण्यापूर्वी या माणसाने कोणत्या परिस्थितीवर विजय मिळवत आपला प्रवास कसा पूर्ण केला हे मोजक्याच लोकांना माहिती आहे.ते सर्वसामान्य माणसाला कळणे गरजेचे आहे.
साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी पालगड येथे झाला. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे.वडील इंग्रजांच्या काळात गावात खोताचे काम करत असे.घरात लहान लहान इतरही भावंडे होती.एकंदरीत कुटुंब मोठे होते पण घरात कमाई अशी मजबुत नव्हती.मोठे घर पोकळ वासा या म्हणीप्रमाणे तारेवरच्या कसरती प्रमाणे यांचे आयुष्य जात होते.
दापोली मध्ये प्राथमिक शिक्षण चालू होते.पुस्तके सुद्धा कधी कधी मिळत नव्हती.एके दिवशी शाळेत असे कोण कोण गरीब विद्यार्थी आहे त्यांना सरकार मदत देणार आहे उठा पाहू असे त्यांचे गुरुजी बोलू लागले त्या वेळी हे साने उठले आणि बोलले गुरुजी मला ही सवलत मिळावी त्यावर ते त्यांचे गुरुजी बोलले की तू तर खोताच्या घरचा ना तुला कशाला मदत हवी ? असे ऐकल्या बरोबर साने गुरुजींना खूप वाईट वाटले.वडील खोताचे काम तर करत होते परंतु सतत कर्जाच्या खाईत त्यांचे कुटुंब असल्याने शाळेतील पुस्तके सुद्धा विकत घेता येत नव्हती.शाळेतील हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी ती शाळा सोडण्याचा विचार केला, दापोलीत असताना एक आठवड्यांनी ते आपल्या घरी येत असायचे आणि राहिलेली आपल्या आईची कामे करत असायचे.
एके दिवशी गावातील पोरं साने गुरुजींना म्हणजेच श्याम ला (श्याम हे आईने ठेवलेले टोपण नाव)बोलू लागली की श्याम चल आमच्या बरोबर विहिरीत पोहायला परंतु श्याम त्यांच्या बरोबर गेला नाही.पोहायला गेल्यानंतर पाण्यात बुडले तर, या भीती पोटी तो त्यांच्या बरोबर गेला नाही असे दोन तीन वेळा झाले होते. आणि त्यांची आई हे सर्व पाहत होती.ती विचार करू लागली की जर या वयात याची भीती गेली नाही तर जन्मभर याला पोहायला येणारच नाही.मग तिसऱ्या दिवशी ज्यावेळी मुले त्याला बोलवू लागली तेव्हा सुद्धा त्याने न जाण्याचाच विचार ठरवला होता. मग मात्र त्यांच्या आईने चिंचेचा एक फोक काढला आणि त्याला खूप मारले व बोलू लागली आज जर पोहायला शिकला नाही तर घरी तुझे तोंड ही दाखवू नको. मार खाल्लेल्या अवस्थेत श्याम मित्रांबरोबर विहिरीवर पोहायला गेला.मित्रांनी त्याला व्यवस्थित पाण्यात कसे तरंगले जाते याचे धडे दिले आणि श्याम त्यादिवशी पोहायला शिकला.तिकडून आल्यानंतर त्यांच्या आईने पाठीवर उमटलेले वळ खोबरे तेलाने शेकवले आणि रडू लागली श्याम जर तुला मारले नसते तर तू पोहायला शिकला नसता वेळप्रसंगी आईला कठोर व्हावे लागले रे अशी ती माऊली समजावणीच्या सुरात बोलू लागली.
लहान असतानाचा प्रसंग श्यामला खूप काही शिकवून गेला होता.सकाळच्या प्रहरी श्यामने आंघोळ केली होती.न्हाणी घरातून बाहेर येत असताना त्याचे पाय जमिनीवर ठेवावे लागणार होते ,तेव्हा आईला तो बोलू लागला आई तुझा पदर जरा जमिनीवर ठेव मग मी माझे पाय त्यावर ठेवेल सारवलेल्या जागे पर्यंत मला जाता येईल व गेल्यानंतर माझे पाय मातीने भरणार नाही तेव्हा त्याची आई त्याला बोलली श्याम जर एवढाच स्वतःला जपतो तर उभ्या आयुष्यात सुद्धा कलंक लागेल असे कोणतेच काम करू नको .हे वाक्य मात्र त्याने शेवट पर्यंत जपून ठेवले होते.
दापोलीतील शाळा सोडून ते घाटावर शिक्षण घेण्यासाठी आले होते.औंध संस्थानचे अधिपती गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात ही बातमी त्यांना कोणी तरी सांगितली होती. मग त्यांनी अंगावर घोंगडी,हातात कंदील आणि एक पत्र्याची पेटी व प्रवासापुरते पैसे घेतले व ते घाटावर आले
तिथे आल्यानंतर त्यांना समजले की ही सवलत महाराजांनी कधीच बंद केली आहे.त्याकाळी अशी ही काही माणसं होती की अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत होती.असाच एक सद्गृहस्थ त्यांना बोलला की तुम्ही इथं पर्यंत आला तर तुम्हाला राहण्याची,खाण्याची सोय आम्ही करू. मग तिथे वार लावले जायचे आज इकडे तर दोन दिवस दुसरीकडे अशी जेवणाची सोय होत होती.कधी कधी जेवण ही मिळत नसायचे.एके दिवशी ज्या घरी वार होता त्या घरची सगळी मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती.त्या दिवशी त्यांना जेवण मिळणार नव्हते.रात्रीचे आठ वाजले होते.पोटात कावळे ओरडत होते. पोर वयातील ती भूक किती असते याची कल्पना न केलेलीच बरी.श्यामला वाटले की मारुती मंदिरात चार दोन आणे दक्षिणा म्हणून टाकलेली जर आपण घेतली तर त्या चार आण्याचे कुरमुरे घेतले तर आपली भूक भागेल या विचाराने श्याम त्या मंदिरात गेले. आजू बाजूला पाहिले कोणी ही नव्हते त्या पैशापर्यंत पोहचले आणि पैसे उचलणार तेवढ्यात त्याच्या आईचे शब्द कानात घुमू लागले की श्याम एवढा जर स्वतःला जपतो तर आयुष्याला कलंक लागेल असे कोणतेच काम करू नको.आईचा तो अंतर्नाद ऐकू येऊ लागला.आणि त्यांनी ते पैसे घेतले नाही रात्रभर थंडीत कुडकुडत त्यांनी ती रात्र कोणत्याही अन्नाविना काढली.असे बरे, वाईट, दिवस चालले असताना प्लेग ची साथ आली आणि शाळेला अनिश्चित काळासाठी सुट्टी लागली.तेव्हा जवळ असणारी घोंगडी,कंदील विकून ते कोकणात परत आले होते.असे शिक्षण श्यामच्या नशिबी आले होते.सलग असे शिक्षणच घेता येत नव्हते.
कोकणात घरी आल्यानंतर बरेच दिवस श्याम शिक्षणाविना अडखळून राहिला होता.त्यावेळी त्याचे वडील त्याला बोलू लागले तुला पुढील शिक्षण घ्यायचे आहे की नाही?या प्रश्नाने श्याम अडचणीत आला मग त्याने जोशी नावाच्या मित्राला पत्र पाठवून शाळेविषयी विचारले त्यावेळी त्याने तू पुण्याला ये काही तरी आपण करू मग श्याम पुण्यात आला आणि पुढील शिक्षण घेऊ लागला.यावेळी सकाळची पेपर लाइन करायची कोणाच्या शेतात काम करावे लागले तरी करायचे असे करून श्याम ने मॅट्रिक परीक्षा पास केली पुढे त्याने कॉलेजमधून बी. ए .केले व नंतर एम. ए. करून तत्त्वज्ञान सारखा विषय घेऊन अमळनेर मध्ये गेले.तिथे काही मुलांच्या प्रायव्हेट शिकवण्या लावल्या आणि यातून त्यांना तिथे गुरुजी म्हणून काम करावे लागले.मुलांना शिकवत असताना वसतिगृहामध्ये मुलांची कपडे ते स्वतः धुवत असे पण मुलांना कधीच हे कळू दिले नाही.मुलांना वाटायचे आमची कपडे कोण धुवत असेल बरे त्यावेळी ते म्हणायचे एक कोण तरी बाई येते आणि आपल्या सर्वांची कपडे धुवून जाते.मुलांना हे खरे वाटत नव्हते एके दिवशी भल्या पहाटे सर्व मुलांनी ठरवले पहाटे लवकर उठून बघू तर खरे आपली कपडे कोण धुवत असेल ते, मुले पहाटे उठून पाहू लागली तर गुरुजी सर्वांची कपडे धुवत आहेत . मुलांनी पाहिल्यानंतर मुलांना खूप वाईट वाटले व गुरुजींना बोलू लागले गुरुजी तुम्ही आम्हाला फसवत होता .कपडे तर तुम्हीच धुवत होता, पण बाईचे नाव सांगत होता.त्यावेळी गुरुजी बोलू लागले बाळांनो तुमची आई असती तर तिने तुमची कपडे धुतलीच असती ना.मला तुमच्या आईच्या ठिकाणी समजा.असे वात्सल्य युक्त प्रेम त्यांनी मुलांना दिले. मुले चांगले शिक्षण घेऊन बाहेर पडू लागली होती.इकडे देशात स्वातंत्र्यासाठी आंदोलने होऊ लागली होती.महात्मा गांधीने सगळ्या देशात सविनय कायदेभंग चळवळ चालू केली होती.काही देशबांधव फासावर जाऊ लागले होते.हे सर्व गुरुजींच्या कानावर येत होते.आपण या शाळेच्या भानगडीत अडकलो तर देशाची सेवा करता येणार नाही.या अगोदर साने गुरुजींनी राष्ट्रीय सेवा दलात सभासदत्व पत्करले होते.महात्मा गांधी एखाद्या दैवतासारखे अवघ्या भारतीयांची मने जिंकत होते.आपण जर महात्मा गांधी बरोबर राहिलो तर देश सेवा केल्याचे आत्मिक समाधान लाभेल मग गुरुजींनी एक कल्पना आखली.शाळेतून कायमची सुट्टी मागितली तर मुख्याध्यापक देणार नाही मग त्यांनी भल्या पहाटे आपले सगळे सामान भरले आणि ते वसतिगृह सोडले पण सोडण्यापूर्वी त्यांनी मुख्याध्यापक यांना चिठ्ठी लिहिली की गुरुजी मला माफ करा मी ही शाळा कायमची सोडून जात आहे.शाळेत असताना मला देशाची सेवा करता येणार नव्हती म्हणून मी हे पाऊल उचलत आहे.शाळेच्या पायरीवर दोन चार फुले ठेवली आणि चिठ्ठी ठेऊन गुरुजींनी रेल्वे पकडली व आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले.
कित्येक वेळा गुरुजींना तुरुंगात जावे लागले.तुरुंगात असताना त्यांनी बरेच लेखन केले होते.देशातील इतरही भाषेवर त्यांचे विशेष प्रेम राहिले होते.विनोबा भावे यांनी भगवद्गीता आपल्या आईला प्रवचनाच्या रूपात सांगितली पण ते लेखन साने गुरुजींनी केले तोच गीताई नावाचा ग्रंथ प्रसिध्द झाला.
पंढरपूर मध्ये दलिताना प्रवेश नव्हता. तो प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी पंढरपूर मध्ये आमरण उपोषण केले.महात्मा गांधींनी ते उपोषण थांबवण्यास सांगितले पण साने गुरुजींनी स्पष्ट शब्दात त्यांना कळविले बापुजी मी तुम्हाला गुरुस्थानी मानतो पण या प्रकरणात मी तुमचे ऐकू शकत नाही दहा दिवसानंतर साने गुरुजींना यश आले व तमाम दलिताना पंढरपूर मध्ये प्रवेश मिळाला.
देश स्वतंत्र झाला पण देशातील गरिबी प्रचंड प्रमाणात वाढली होती.पुढे 1948 मध्ये महात्मा गांधीचा खून झाला.या घटनेचा साने गुरुजींच्या मनावर खोलवर परिणाम झाला.देश स्वतंत्र करण्याकरिता ज्या महात्मा गांधींनी सर्वस्वाचा त्याग केला त्या महात्म्याची अशी हत्या व्हावी हे दुःख साने गुरुजी पचवू शकले नाही.या स्वार्थी दुनियेत न जगलेले बरे असे त्यांना वाटायला लागले.
11जून 1950 चा तो दिवस होता.अत्यंत संवेदनशील असणारे गुरुजी पांढरे शुभ्र धोतर ,पांढरे नेहरू घातलेल्या अवस्थेत त्यांनी विष घेतले व या दुनियेचा अखेरचा निरोप घेतला.त्यावेळी त्यांचे वय अवघे पन्नास वर्षाचे होते जन्मभर अविवाहित राहून आईच्या मृत्यू नंतर आपला देश हिच आपली आई आहे असे मानणारे साने गुरुजी अमर होऊन गेले.






