
पंचनामा प्रतिनिधी – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करून शौर्य, त्याग आणि कर्तव्याची प्रेरणादायी गाथा निर्माण करणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे माजी सैनिक स्नेहमेळावा व गौरव सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या यावेळी शिवनेरी माजी सैनिक संघटना, जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना या संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी व परिसरातील ५० माजी सैनिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष मा. माऊली शेठ शेळके होते.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त मा. वल्लभ शेळके यांनी उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने माजी सैनिकांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहमेळाव्याची परंपरा, तसेच त्यांच्या त्याग आणि योगदानाबद्दल संस्थेच्या मनात असलेला आदर त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या शौर्यामुळे देशाची सीमा सुरक्षित राहते आणि नागरिकांचे जीवन निर्धास्त होते.माजी सैनिक हे आपल्या समाजाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या अनुभवातून युवा पिढीने देशप्रेम,शिस्त आणि कर्तव्यभावना आत्मसात करावी,असा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊलीशेठ शेळके यांनी दिला.
यावेळी कॅप्टन महादेव हाडवळे, गोपीनाथ कुटे, प्रवीण शेळके आणि राहुल गाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय सैन्यातील देशसेवेच्या अनुभवांना उजाळा दिला.
कॅप्टन महादेव हाडवळे यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करणे ही केवळ नोकरी नसून राष्ट्राप्रती असलेली सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सांगितले. गोपीनाथ कुटे यांनी सैन्यसेवेतील शिस्त आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.प्रवीण शेळके यांनी युवा पिढीने देशाच्या इतिहासाचा, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आणि भारतीय जवानांच्या शौर्याचा आदर करावा, असे आवाहन केले.
राहुल गाडगे यांनी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिक सन्मान सोहळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, देशसेवकांच्या त्यागाचा आणि शौर्याचा गौरव करण्यासाठी संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. माजी सैनिकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून त्यांच्या माध्यमातून देशसेवेच्या मूल्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. देशसेवेच्या काळातील त्यांच्या योगदानाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकांचे राष्ट्ररक्षणातील योगदान, त्याग, शौर्य आणि शिस्त यांची जाणीव करून देण्यात आली.माजी सैनिक स्नेह मेळाव्यासाठी गोपीनाथ कुटे, महादेव हाडवळे,प्रवीण शेळके,धोंडीभाऊ कुंजीर,शरद बेळे, बबन शिंदे, पंढरीनाथ घोटकर, दत्तात्रय सोमोशी, सुनील गाडगे,आनंद खुटाळ, बाळासाहेब मुळे, कैलास कबाडी, कृष्णा दुराफे, अतुल ढवळे,भरत शेलार, दामोदर घोलप, बबीता जाधव, शिवाजी चौधरी, श्रीधर बाळसराफ,साईनाथ झिंजाड ,मार्तंड घोलप,किसन फापाळे, तानाजी कोरडे, संभाजी वाळुंज, मोहन बनसोडे, नामदेव साबळे, विजय सहाने, महादेव मुळे,चंद्रकांत जाधव, पांडुरंग कुटे, होणाजी गुंजाळ, ज्ञानदेव थोरवे, संतोष काळे, हरिश्चंद्र कोल्हे, निवृत्ती तांबे, रामदास पाडेकर, दत्तात्रय आरोटे, रत्नप्रभा कुलकर्णी, संगीता नाईक, नितीन पटवाल, शिवाजी पाटील,अरुण वऱ्हाडी, राहुल गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी केले.त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत माजी सैनिकांच्या देशसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा संचालक एच पी नरसुडे व डॉ.शरद पारखे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांचे आभार मानले.



