
पंचनामा प्रतिनिधी – देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन शिरदाळे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या सामाजिक उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी, विद्यार्थी तसेच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून शिरदाळे गावात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावातील तलाव परिसर तसेच वनविभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली असून, लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संवर्धन व संगोपन करण्यावरही ग्रुपकडून भर दिला जात आहे.
वृक्षलागवडीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप यांसारखे उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक जाणीव जपण्याचे काम ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याची माहिती ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपचे सदस्य सुशांत तांबे यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडूनही ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ग्रुपच्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.



