
खडकवाडी : आंबेगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, खडकवाडीचे मुख्याध्यापक नवल देवराव पगार यांना पुणे जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले समर्पित कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (TDF), पुणे जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघ व पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर रोजी वाजेवाडी, चौफुला, चाकण-शिक्रापूर रोड येथील मयुरी लॉन्स येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते पगार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभय साळुंखे होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे (TDF) अध्यक्ष जी. के. थोरात, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष के. एस. ढोमसे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा स्नेहल बाळासाहेब, मुरलीधर मांजरे, सोमनाथ भंडारे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आंबेगाव तालुका माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्षा योगिता शिंदे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब सगळे, संतोष बाळू शिंदे, दिलीप गंगाधर चौधरी तसेच विद्यालयातील सहकारी उपस्थित होते.
पगार यांच्या पुरस्कारामुळे माध्यमिक विद्यालय, खडकवाडी तसेच आंबेगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आंबेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षिका संघ, शिक्षक लोकशाही आघाडी (TDF), पालक सल्लागार समिती, व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



