सामाजिक

विठुरायाच्या पंढरीच्या सेवेचे वारकरी : राजेंद्र शेळके

1010859915
1010859915

तीन वर्षांत मंदिर प्रशासनाला दिली आधुनिक, पारदर्शक आणि भाविककेंद्री दिशा

पंढरपूर : पंढरीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून लाखो-करोडो विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेशी जोडलेले एक पवित्र नाते आहे. या भावनेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मंदिर समितीच्या प्रशासनाला आधुनिक, पारदर्शक आणि भाविककेंद्री दिशा दिली. सेवा कार्याला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पंढरपूरच्या धार्मिक व प्रशासकीय व्यवस्थेवर आपला वेगळा ठसा उमटविला. किंबहुना, विठुरायाच्या पंढरीच्या सेवेचे ते खऱ्या अर्थाने वारकरी ठरले.

सन २०२३ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाल्यानंतर शेळके यांनी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामांना प्राधान्य दिले. पंढरीच्या प्राचीन मंदिराचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन व्हावा, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला.

भाविकांच्या दर्शन व्यवस्थेतही त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. व्हीआयपी दर्शनावर निर्बंध आणून सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. टोकन दर्शन प्रणाली सुरू करून दर्शन व्यवस्थेत अधिक शिस्त आणि पारदर्शकता आणण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत विविध धार्मिक सेवा भाविकांना घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऑनलाइन पूजेची सुविधा सुरू करण्यात आली.

भक्तनिवासातील खोल्यांच्या आरक्षणासाठी संगणकीकृत प्रणाली विकसित करण्यात आली. दर्शन रांगेतील भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जर्मन हँगरसह विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वाढती भाविकसंख्या आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विस्तार लक्षात घेऊन स्कायवॉक व दर्शन हॉलच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. भविष्यातील दर्शन व्यवस्थेची पायाभरणी करणारे हे महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहेत.

शेळके यांच्या कार्यकाळातील आणखी एक ऐतिहासिक बाब म्हणजे मंदिर समितीच्या इतिहासात प्रथमच सलग चार आषाढी यात्रांचे नियोजन करण्याची संधी त्यांना लाभली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आषाढी यात्रांचे नियोजन, प्रशासन आणि भाविकांच्या सुविधांचे व्यवस्थापन त्यांनी प्रभावीपणे हाताळले.

विठ्ठल भक्तांची सेवा करत असतानाच मंदिरातील सेवेकरी व कर्मचारी वर्गाच्या हिताचाही त्यांनी गांभीर्याने विचार केला. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची महत्त्वपूर्ण कार्यवाही त्यांच्या कार्यकाळात झाली. तसेच भाविकांना धार्मिक सेवांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता यावे, यासाठी तुळशी अर्चन पूजा सुरू करण्यात आली. नित्य पूजेमध्ये दोन भाविकांना सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली.

मंदिर समितीच्या विविध विभागांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून संस्थांच्या नियुक्तीबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मंदिर जतन-संवर्धन, भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, ऑनलाइन धार्मिक सेवा, भक्तनिवासाचे संगणकीकरण, अत्याधुनिक दर्शन सुविधा, स्कायवॉक व दर्शन हॉलसारखे विकास प्रकल्प, आषाढी यात्रेचे प्रभावी नियोजन, कर्मचारी कल्याण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांतील कामगिरीमुळे राजेंद्र शेळके यांच्या कार्यकाळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

सन २०२३ मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त झालेले राजेंद्र शेळके यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने त्यांची कल्याण येथे प्रांताधिकारी म्हणून बदलीने पदस्थापना केली आहे. त्यांच्या जागी मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पंढरीच्या विठुरायाच्या सेवेत राजेंद्र शेळके यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेली विकासकामे आणि मंदिर प्रशासनाला दिलेली नवी, आधुनिक व भाविकाभिमुख दिशा ही त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी ओळख राहणार आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर विठुरायाच्या सेवेसाठी झटणारे एक वारकरी म्हणूनच विठ्ठल भक्तांच्या स्मरणात त्यांचा कार्यकाळ राहील.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

पुणे जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी,अध्यक्ष चषक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या हस्ते सन्मान !!

Chief Editor

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यावर ध्वजवंदन उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment