
शाडू मातीपासून मूर्ती निर्मिती; सुमारे ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !!
पंचनामा प्रतिनिधी - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे ३०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलाकौशल्यातून सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून विविध आकारांच्या व आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्ती निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कलात्मक अभिव्यक्तीची संधी मिळाली नाही, तर पारंपरिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे महत्त्वही समजले. शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पर्यावरणावर होणारा परिणाम तुलनेने कमी असतो. त्यामुळे जलप्रदूषण टाळणे, नद्या व जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक सण साजरे करणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण झाली.
या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीची प्राथमिक तंत्रे, मातीला आकार देण्याच्या पद्धती, मूर्तीचे संतुलन राखणे तसेच सजावटीतील कल्पकता याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने मूर्ती तयार करताना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

या उपक्रमासाठी कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मातीची निवड, मूर्तीची रचना व निर्मिती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच गुरुकुलमधील इतर शिक्षक व शिक्षिकांनीही विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य केले. समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या नियोजनातून आणि क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत आणि प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडून आला. ‘मातीपासून मूर्ती, पर्यावरणाची जपणूक आणि संस्कृतीचा सन्मान’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.



