
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील कष्टकरी आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतील चार तरुण-तरुणींनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचे वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत पोलीस दलात प्रवेश केला आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव तालुक्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
भाग्यश्री जगन्नाथ जाधव (जाधववाडी), प्रशांत बबन दांगट (निरगुडसर), श्वेता सुखदेव करंडे (काठापूर) आणि स्वप्निल मच्छिंद्र हिंगे (अवसरी बुद्रुक) यांनी नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वर्षभराचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. मंगळवार (ता. ९) पासून त्यांनी अधिकृतपणे पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला आहे.
शेतातील कष्ट, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत या चारही जणांनी स्पर्धा परीक्षेचा प्रवास यशस्वी केला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे अथक परिश्रम, कुटुंबीयांचा त्याग आणि स्वतःची अविरत मेहनत आहे.
प्रशिक्षणादरम्यान त्यांना दैनंदिन शारीरिक सराव, पोलीस ठाण्यातील कामकाज, गुन्ह्यांचा तपास व शोध, कायद्याची अंमलबजावणी, गोपनीयता, शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यपद्धती, नागरिकांशी संवाद व समन्वय, नेतृत्वगुण, वक्तृत्व आणि समयसूचकता यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी झालेल्या भव्य दीक्षांत समारंभात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते एकूण ५८३ पोलीस उपनिरीक्षकांना पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. वर्षानुवर्षांच्या संघर्षाचे चीज झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
गावातील मातीशी नाळ जोडून ठेवत मोठे स्वप्न पाहणाऱ्या या चार युवक-युवतींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशामुळे आंबेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील कष्टकरी शेतकरी कुटुंबांतील चार युवक-युवतींनी पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात प्रवेश केल्याचा मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. खाकी वर्दी ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची आणि जबाबदारीची मोठी संधी आहे. या चारही अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे, संवेदनशीलतेने आणि कर्तव्यनिष्ठेने जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या यशामुळे आंबेगाव तालुक्याची मान राज्यभर उंचावली असून ते येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरतील.”






