सामाजिक

“मनातलं गाणं… आता रंगमंचावर!”महानगायक मोहम्मद रफी स्मृतिदिनानिमित्त धामणीत ‘यादे…’ची सुरेल मैफल; ‘या गायक व्हा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

1010382016

पंचनामा विशेष – धामणी आणि पंचक्रोशीतील संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय सुरेल पर्वणी सज्ज झाली आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेले गाणे आता थेट रंगमंचावर सादर करण्याची सुवर्णसंधी सॅटर्डे क्लब ऑफ धामणीने उपलब्ध करून दिली आहे. महानगायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘यादे…’ हा गीत-संगीताचा अनोखा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत रंगणार असून, या कार्यक्रमाची धामणीसह संपूर्ण पंचक्रोशीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, “या गायक व्हा…” या अभिनव संकल्पनेला रसिक गायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २५ हून अधिक गायकांनी सहभाग निश्चित केला आहे. आपल्या मनातील आवडते गीत व्यावसायिक दर्जाच्या कराओके संगीत, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, आकर्षक लाईटिंग आणि अनुभवी गायकांच्या सहकार्याने सादर करण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.अशा प्रकारचा खुला गीत-संगीताचा कार्यक्रम आंबेगाव तालुक्यात प्रथमच होत असल्याने संगीतप्रेमींमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे या सुरेल मैफलीची रंगत आणखी वाढणार आहे.

गेली २३ वर्षे सॅटर्डे क्लब ऑफ धामणीने गीत-संगीत, पर्यटन, सामाजिक बांधिलकी, अभ्यास, सांस्कृतिक उपक्रम, खाद्यसंस्कृती आणि मैत्रीबंध यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत समाजातील सर्व स्तरांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्याच परंपरेचा एक सुंदर आविष्कार म्हणजे ‘यादे…’ हा कार्यक्रम.

कार्यक्रमात महानगायक मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांसह विविध भावगीत, चित्रपटगीत आणि लोकप्रिय गाण्यांची सुरेल मैफल रंगणार असून, गायकांच्या आवाजातून रसिकांना संस्मरणीय संगीताचा आनंद अनुभवता येणार आहे.

“तुमच्या मनातही एखादं गाणं दडलंय? मग या… रंगमंच तुमचाच आहे! आणि जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, तर या सुरेल मैफलीचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी अजिबात दवडू नका,” असे आवाहन सॅटर्डे क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

धामणीच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले असून, ‘यादे…’ ही केवळ मैफल नसून प्रत्येकाच्या मनातील सुरांना मिळणारा एक सुंदर उत्सव ठरणार आहे.
“या… गायक व्हा! मनातलं गाणं गा… आणि टाळ्यांच्या कडकडाटात अविस्मरणीय आठवणींचा स्वरमहोत्सव अनुभवाः!””

1009850407

Related posts

“श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंड्यांकडून कौतुक !!

Chief Editor

अखेर मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांत हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment