
पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे गेली शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंचांग वाचन केले जाते.ही गेली शेकडो वर्षांची परंपरा असून संपूर्ण वर्षभराचे नियोजन शेतकरी या आधारावर करत असतात.यात चालू वर्षाचे पर्जन्यमान,हवामान याचा अंदाज वर्तवला जातो.

सकाळी गुढी उभारल्यानंतर गावातील ग्रामस्थ शिरदाळे महादेव मंदिर परिसरात जमतात.त्याठिकाणी पंचांगाचे पूजन केले जाते.पंचांगाच्या सुरवातीला चालू संवत्सराचे (वर्षाचे) नाव वाचले जाते.ते साठ वर्षांच्या चक्रातील एक असते.त्याचा निसर्ग व मानवी जीवनावर परिणाम मनाला जातो.

वर्षफल (भविष्यफल):- यात देशाची स्थिती,पर्जन्यमान,आरोग्यविषयक अंदाज,राजकीय परिस्थिती यावर भाष्य केलेले असते.तसेच वर्षभरातील सण,वार सुवर्ण खरेदीचे मुहूर्त,साडेतीन मुहूर्त कधी आहेत याचे देखील वाचन केले जाते.

नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला गावातील अनेक ग्रामस्थ,जेष्ठ मंडळी,तरुण मंडळी हे संवत्सर फल आवर्जून ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यातून शेतकरी बांधवांना संपूर्ण पावसाचा अंदाज दिला जातो.तसेच ते आपल्या शेतीचे नियोजन देखील याच आधारावर करत असतात.त्यामुळे ग्रामीण भागात या परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.

शेवटच्या टप्प्यात सर्वांना ज्वारीचे दाणे वाटप केले जातात आणि ते दोन दोन असे जोडून वाढविण्याची पद्धत असून एक दाणा वाढणे म्हणजे शुभ (पास) आणि न वाढणे म्हणजे अशुभ (नापास) अशी देखील भावना जपली जाते.

या परंपरेला ग्रामीण भागात महत्व असून त्याचे वाचन आणि श्रवण हे आवर्जून केले जाते.यंदाच्या अंदाजात चांगले पर्जन्यमान असून प्रत्येक ऋतूमध्ये समाधानकारक पाऊस होणार असून काही ठिकाणी अतिवृष्टी देखील सांगितली आहे.ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला पाऊस कमी असून उत्तरार्धात मात्र त्याची भरपाई होईल असे पंचांग वाचक श्री.संजय तांबे यांनी सांगितले आहे.

जुलै आणि ऑगस्ट मधे नदी,नाले,धरणे ही जलमय होण्याचा अंदाज आहे. अशी समाधानकारक बाब या पंचांगाच्या माध्यमातून समोर आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




