सामाजिक

कळमोडी धरण १००% भरले; आरळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

img 20260707 wa0629
img 20260707 wa0629

पंचनामा प्रतिनिधी – खेड तालुक्यातील पश्चिम भागातील महत्त्वाकांक्षी कळमोडी धरण सोमवारी (ता.६) रात्री उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे धरणाने १०० टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली असून, धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने सांडव्यावरून आरळा नदीपात्रात ६७०० क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने आरळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता शुभम सुसुंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमोडी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ टीएमसी इतकी आहे. गेल्या शुक्रवारी (ता.३) धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे आणि घोटवडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आवक झाली. धरण क्षेत्रात आतापर्यंत ५२६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २४ जूनलाच भरलेले हे धरण, यंदा पावसाच्या विलंबाने ७ जुलैच्या आसपास भरले आहे.कळमोडी धरणातून सोडलेले पाणी थेट चासकमान धरणात जाऊन मिळत आहे. चासकमानच्या पाणलोट क्षेत्रातही भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी आणि टोकावडे परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने चासकमानच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत चासकमान धरणात ३६.१४ टक्के पाणीसाठा झाला होता. आता कळमोडीचा विसर्गही यात समाविष्ट होत असल्याने चासकमान धरण लवकरच भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​नागरिकांना आवाहन: आरळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts

महिला उन्नती वारी” उपक्रमाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Chief Editor

८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट !!

Chief Editor

धोकादायक विहिरीला बसवले कठडे;पारगाव (शिंगवे) परिसरातील वाहतूक सुरक्षित !!

Chief Editor

Leave a Comment