
पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर फाटा ते लोणी या महत्त्वाच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर संबंधित विभागाच्या वतीने या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
निरगुडसर फाटा–लोणी हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी तसेच विविध व्यावसायिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
या मार्गावरून रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर एमआयडीसी, कारेगाव एमआयडीसी, नारायणगावचा टोमॅटो बाजार, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, खेड एमआयडीसी आदी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच वाहनांचेही नुकसान होत होते.

खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली होती. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाच्या वतीने अखेर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे निरगुडसर फाटा ते लोणी मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्त्याची दुरुस्ती केवळ खड्डे बुजविण्यापुरती मर्यादित न ठेवता, भविष्यात या मार्गाची आवश्यक ती डागडुजी व देखभाल नियमितपणे करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






