आरोग्य व शिक्षणसामाजिक

धामणी(ता.आंबेगाव) येथे २ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होणार सोमवती सोहळा!!

शाहीस्नान,पालखी,महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे २ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होणार सोमवती सोहळा!!

शाहीस्नान,पालखी,महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन!!

श्रावण कृष्ण पक्ष सोमवती अमावस्येला खंडोबाच्या पंचधातुच्या मुखवट्याला शाहीस्नान,पालखीची वाजतगाजत मिरवणूक व मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्याचा निर्णय धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात आयोजित केलेल्या ग्रामस्थ,देवस्थानाचे सेवेकरी,खांदेकरी,मानाच्या काठीचे मानकरीव पंचक्रोशीतील भाविकांच्या बैठकीत नारळी पौर्णिमेला घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

पंचागानुसार श्रावण महिण्यातील दुसरी सोमवती २ सप्टेबरला सोमवारी पहाटे ५ वाजून २१मिनिटाने या उगवती अमावस्येला सुरुवात होत असून या सोमवतीचा कार्यकाळ मंगळवारी (३ सप्टेंबर) सकाळी ७ वाजून २४ मिनिटापर्यत आहे. सोमवारी संपूर्ण दिवसभर सोमवतीचा कार्यकाल असल्याने सोमवतीच्या या दिवशी शाहीस्नानात सहभागी झाल्यानंतर भाविकांच्या कष्टाला मुक्ती मिळते व अन्नदानात सहभागी झाले तर आपला पितृदोष जाऊन दैनदिन कार्यकाळात यश प्राप्त होते अशी भाविकांची निस्सीम श्रध्दा असल्याने सोमवतीला खंडोबा म्हाळसाई व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्याला शाहीस्नान घालण्यासाठी व पालखी, महाप्रसाद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे,नगर,नाशिक जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित राहतात असे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

सोमवतीच्या दिवशी पहाटे मुख्य मंदिरात खंडोबाचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिरातून खंडोबा,म्हाळसाई व बाणाईचे पंचधातूचे सर्वांगसुंदर मुखवटे वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर आणण्यात येतात. त्या ठिकाणी असलेल्या व नवीन बांधलेल्या सोमवतीच्या ओट्यावर मुखवट्यांना शाहीस्नान पारंपारिक पूजा व महाआरती करण्यात येते.

त्यानंतर देवाचे काठीचे मानकरी,सेवेकरी,खांदेकरी व नगर,नाशिक व पुणे जिल्ह्यातील कुलदैवत असलेल्या कुळांचा व उपस्थित सर्व भाविकांचा व ग्रामस्थांचा देवस्थानाच्या वतीने देवाची मानाची टाँवेल टोपी व महिला भाविकांना शाल देऊन सत्कार करण्यात येत असतो.

त्यानंतर धामणीच्या पेठेतून पालखीची लोणी,धामणी,संविदणे,कवठे येथील देवाचे मानकरी पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून त्यानंतर मंदिरात उपस्थित सर्वाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशीतील भाविकांनी व ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ धामणी,शिरदाळे,पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती व देवाचे सेवेकरी मंडळीनी केले आहे.

खंडोबा देवस्थानाच्या “मल्हार”महाद्बाराच्या दोन्ही बाजूला बसवण्यासाठी साडेपांच फूट उंचीची जयविजय ची दोन संगमरवरी शिल्पे जयपूर (राजस्थान) येथून चांडोह ( तालुका शिरुर) येथील बबनराव अर्जुन भुमकर व ठाणे (मुंबई) येथील निवृत्त प्राचार्य राजाराम बबनराव विधाटे यांनी आणलेली असून सोमवतीला ही शिल्पे खंडोबाला अर्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी ग्रामस्थ,मानकरी,सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.