आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नाते कलेचे त्या रक्ताशी – आजचा विशेष लेख, प्रसिद्ध ढोलकी सम्राट श्री जनार्धन आनंदराव वायदंडे

साभार लेख - श्री. शाहीर खंदारे

महाराष्ट्रातील प्रिय सुज्ञ रसिक जन हो…. ,
नाते कलेचे त्या रक्ताशी या लेखमालेचे आजचे आकर्षण.
तमाशा इतिहासातील, कै.दत्ता महाडिक पुणेकर (अण्णा) यांच्या गाण्याला, अभंग वाणीला आणि वगनाट्यातील नांदीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, ढोलकीच्या संगीतावर पोहोचविणारे जनार्धन आनंदराव वायदंडे होय.मु.पो.कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे होय.

त्यांच्या आईचे नाव शाहूबाई असून त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे. जनार्धन वायदंडे यांना वयाच्या सातव्या वर्षापासून वाद्य वाजवण्याचा छंद लागला. कारण त्यांचे वडीलच ढोलकी पट्टू होते, म्हणून लवकरच ही वाजवण्याची कला त्यांच्या अंगी आत्मसात झाली. ढोलकी वाजवण्याची कला आत्मसात झाल्यानंतर जनार्दन वायदंडे यांनी महाराष्ट्रात आपले नाव गाजविले. त्यांनी सरस्वती बाई कोल्हापूरकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर,कैलासवासी हरिभाऊ बडे नगरकर, चंद्रकांत दत्ता महाडिक पुणेकर, तसेच गुलाबराव बोरगावकर या तमाशामध्ये ढोलकीची साथ देऊन, त्या तमाशाला त्यांचे योगदान प्राप्त झाले. या तमाशात वाद्याचे काम केल्यानंतर त्यांनी कै.दत्ता महाडिक पुणेकर( अण्णा )या तमाशाला संपूर्ण आयुष्यचे योगदान दिले.

त्यानंतर वायदंडे यांनी आपल्या ढोलकीच्या तालावर सुलोचनाबाई नरोडे,कांताबाई वाईकर,छबुताई बाई कराडकर,शारदाबाई बोरगावकर, शशिकला सोलापूरकर, प्रभा महाडिक पुणेकर, माया खडागळे जालनेकर इत्यादी स्त्रियांना आपल्या ढोलकीच्या तालावर नाचविले. वायदंडे यांच्या अंगी ताल, स्वर, लय या त्रिवेणी संगमाचा चांगलाच अनुभव आला होता. शक्यतो कै. दत्ता महाडिक पुणेकर (अण्णा) यांची गाणी ही जनार्धन वायदंडे यांनीच वाजवली हे अगदी नक्की. त्यापैकी गेली माझी मैना, लंगडं मारतय उडुनी तंगड, टेरलिंग ची साडी कशाला काळ्या घुशीला, ज्वानीचा सांभाळ दाम डोल, हायब्रीड ज्वारी हायब्रीड बाजरी, चेहरा गोल गोल,तू ग जीवाची मैना इत्यादी गाण्याला ढोलकीची साथ देऊन,महाराष्ट्रातील रसिकांच्या ओठावर ही गाणी ठेवली. ही गाणी वाजली की अण्णांची आठवण आल्याशिवाय राहत नाही हे अगदी खरं…..

रसिक अण्णांच्या गाण्याची व वायदंडे यांच्या ढोलकीची साथ बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते. अण्णा हे संगीताचे रत्नच होते. वायदंडे यांच्या वाद्याची साथ पाहून व कै. अण्णांचे गाणे ऐकून आलेल्या रसिकांचे पैसे फिटत होते व डोळ्याचे पारणेही फिटत होते. वायदंडे म्हणतात की पहिला तमाशाचा जुना बाज राहिला नसून, आता नवीन रसिकांना फक्त गाणी पाहिजे. जुन्या तमाशा चा पहिला बाज वेगळाच होता. वगनाट्य ही धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक होती. ती झाल्याशिवाय तमाशाचा बाज पूर्ण होत नव्हता. वायदंडे म्हणतात की संत ज्ञानेश्वर माझी माऊली यातील नांदी मी वाजवली, संत तुकाराम महाराज या वगनाट्यातील नांदी आणि अभंगवाणी अण्णांनी गायलेली मीच वाजवली, करतो चोखोबा जोहार, यातील अभंग वाणी मीच वाजवली,संत गाडगे महाराज, यातील अभंगवाणी गवळ्याची रंभा यातील अण्णांनी गायलेली गाणी मीच वाजवली. भिल्लांची टोळी, भक्त पुंडलिक यातील नांदी व अभंगवाणी मी माझ्या ढोलकीच्या तालाची साथ देऊन, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवली. वायदंडे यांचे आजचे वय 70 वर्षाचे असून,गेली 55 वर्ष त्यांनी जनतेची व रसिकांची सेवा केली आहे. कलेची किंमत मोजता येत नाही, कला ही अजरामर आहे, कलेला कधीच मरण नाही असे वायदंडे म्हणाले.

शासनाने माझ्या कलेची जाणीव करून, मला आनंदित केले आहे. आज मला आनंद होत आहे, कारण माझं संपूर्ण आयुष्य ढोलकी वाजवण्यात मी रंगदेवतेला वाहिलं, म्हणून शासनाने मला कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर.हा पुरस्कार देऊन सन्मानित केले, खरंच आज माझ्या कलेचे सार्थक झालं असं मला वाटतं.तसेच दरवर्षी बेल्हे या ठिकाणी कै.दत्ता महाडीक (अण्णा) यांची पुण्यतिथी मा.वसंतराव जगताप (अण्णा) हे साजरी करतात.त्या तमाशा मोहत्सोवात श्री.वसंतराव जगताप कै.दत्ता महाडिक अण्णांची हुबेहूब गाणी गाऊन महाडिक अण्णा आजही जिवंत आहेत असा भास रसिकांना निर्माण करून देतात.खरंच वायदंडे यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे पुढील जीवन सुखाचे आनंदाचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
😊
लेखक✍🏻
शाहीर खंदारे
ता. नेवासा
मो.8605558432

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.