आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खेड तालुका लोककला व सांस्कृतिक महोत्सवाने घडवले खेडच्या लोककला व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन!!

खेड तालुका लोककला व सांस्कृतिक महोत्सवाने घडवले खेडच्या लोककला व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन!!

केवळ आर्थिक निकषांवर एखाद्या तालुक्याची श्रीमंती ठरवता येणार नाही. एखादा तालुका आर्थिकदृष्ट्या संपन्न असेलही; पण म्हणून तो समृद्ध असेलच असे नाही…समृद्धी त्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक थोरवीतून येते. नुकताच संपन्न झालेल्या ‘खेड तालुका लोककला व सांस्कृतिक महोत्सव – २०२४’ हा वैविध्यपूर्ण एकदिवसीय लोककला महोत्सव खेड तालुक्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित करणारा ठरला आहे. लोककला व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, पुणे जिल्हा यांनी आयोजित केलेला हा महोत्सव वैविध्यपूर्ण पारंपरिक लोककलांच्या समावेशामुळे आणि अतिउत्कृष्ट सादरीकरणामुळे कला रसिकांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलावंत, फडमालक आणि ज्येष्ठ लोककला अभ्यासकांची उपस्थित मांदियाळी आयोजकांचा उत्साह वाढविणारी होती. आपल्या मुलाबाळांना पारंपरिक कला संस्कृतीचे दर्शन घडविण्याची नामी संधी खेड तालुक्यातील कलाप्रेमींना उपलब्ध झाली होती.

आमचे परममित्र लोककला अभ्यासक श्री. बाबाजी कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेला हा लोककला महोत्सव उत्तरोत्तर रंगत गेला. पारंपरिक संगीत भजन, खंडोबाचे जागरण, देवीचा गोंधळ, भारुड, भराड आणि पारंपरिक वाजंत्री मंडळींच्या सादरीकरणाने सकाळचे सत्र रंगले. दुपारी शाहिरी कला पेश करणाऱ्या ह.भ.प. काशीबाई महाराज आळंदीकर यांच्या पहाडी आवाजातील पोवाडा गायनाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. खेड तालुक्यातील उत्कृष्ट सनई वादक अशी ओळख असलेल्या दत्ता गायकवाड यांच्या अप्रतिम सनई वादनाने उपस्थित दर्दी रसिकांचे कान तृप्त झाले. पाण्याने भरलेले चार हांडे डोक्यावर व एक हंडा कमरेवर घेऊन पदन्यास करणाऱ्या श्री. काळूराम कोळेकर यांच्या हंडा व थाळी नृत्याने श्वास रोखून धरणाऱ्या उपस्थितांच्या काळजाचा ठोकाही चुकवला. सनईवादक दत्ता गायकवाड आणि हंडा व थाळी नृत्य करणारे काळूराम कोळेकर यांना भविष्यात नक्कीच अनेक मोठ्या संधी मिळून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले तर तेच या महोत्सवाचे मोठे यश ठरेल. संध्याकाळच्या सत्रात लावणीसम्राज्ञी सौ. सीमा पोटे नारायणगावकर यांच्या बहारदार लावणी नृत्याने या महोत्सवाला चार चाँद लावले. तमाशा सादरीकरणाने रात्री उशिरा या एकदिवसीय महोत्सवाची सांगता झाली.

या महोत्सवाचे यशस्वी आयोजन करणारे माझे मित्र लोककला अभ्यासक श्री. बाबाजी कोरडेसाहेब आणि मी कोविडकाळात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही काम सुरू केले होते. एकमेकांना प्रोत्साहन देत सुरू झालेल्या प्रवासाचा ‘खेड तालुका लोककला व सांस्कृतिक महोत्सव’ एक महत्त्वाचा टप्पा होता. लोककला अभ्यासक आणि कलावंतांचा एक हितचिंतक म्हणून बाबाजी कोरडे यांनी गेल्या चार वर्षात काय कमावले याची पोचपावती म्हणजे या महोत्सवाला लाभलेली अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांनी कोरडेसाहेबांबद्दल काढलेले गौरवोद्गार होय. ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगेसर, कृतिशील विचारवंत व साहित्यिक पद्मश्री मा. गिरिशकाका प्रभुणे, मेघराजभैय्या राजेभोसले, अध्यक्ष, अ. भा. चि. महामंडळ, चेअरमन मा. वसंतराव जगतापआण्णा, मुख्य प्रवर्तक, बेल्हा तमाशा महोत्सव, ज्येष्ठ लोककला अभ्यासक मा. प्रभाकरजी ओव्हाळ, मा. सोपानजी खुडे, लावणी अभ्यासक डॉ. आबासाहेब शिंदे, माजी प्राचार्य मा. लक्ष्मणराव वाळूंजसर, डॉ. संपतराव पार्लेकरसर, मा. काशिनाथ आल्हाटसर, स्तंभलेखक संजय नलावडे आदी मान्यवरांची उपस्थिती बाबाजी कोरडे यांच्यावरील प्रेम व्यक्त करणारी होती.

कलाभूषण रघुभाऊ खेडकर, लावणीसम्राज्ञी राजश्रीताई नगरकर, डॉ. रेश्माताई परितेकर, संजय दत्ता महाडिक, किरण चंद्रकांत ढवळपुरीकर, पापाभाई गुलाबराव बोरगावकर’, तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे नातु मोहित नारायणगावकर, कैलास दत्तोबा तांबे, ह.भ.प. नंदकुमार दत्तोबा तांबे, अष्टपैलू कलावंत मुरलीधर शिंदे, विलास देवठाणकर, विनोदमूर्ती विनोद अवसरीकर, ज्येष्ठ कलावंत अशोक पेठकर, सिनेअभिनेते राजू डोळस आदी अनेक फडमालक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहिले ही या महोत्सवाची फलश्रुती आहे. हा खेड तालुका लोककला व सांस्कृतिक महोत्सव निश्चितच इतर तालुक्यांनाही प्रेरणा देणारा आहे. या महोत्सवाला गर्दी कमी असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्दी कलाप्रेमी मंडळी उपस्थित होती ही जमेची बाजू आहे. त्यामुळे बाबाजी कोरडेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी निराश न होता अधिक उत्साहाने हा कला संस्कृती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला पाहिजे. दारुच्या गुत्त्यावर माणसं स्वतःहून जातात; दूधाचा मात्र रतिब टाकावा लागतो. आपली लोककला आणि संस्कृती म्हणजे बावणकशी सोनं आहे… चकाकल्याशिवाय राहणार नाही.

साभार – संजय नलावडे
धोलवड, मुंबई

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.