आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आता गेले ते दिवस!!!असे दिवस पुन्हा पाहायला मिळतील की नाही? हे माहित नाही…परंतू ते दिवस गेले म्हणून रडण्यात काही अर्थ नाही.

वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून ”वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर’ ह्या फडाचा कार्यक्रम बापाच्या मांडीवर बसून पाहायला सुरुवात केली.ही सर्व मंडळी एकत्र असताना गणापासून तर भैरवीपर्यंत समोरचा तमाशा रसिक जागचा हालत नव्हता…!

मला आजही आठवतेय यांचे ‘महाराष्ट्र झुकत नाही’ हे वगनाट्य…गणपतराव माने यांनी ह्याच वगनाट्यातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलाय…रात्री दहा वाजता कार्यक्रम सुरु झाला. पुर्ण चार आंतरे करूनच गण संपला.

त्यानंतर रंगमंचावर खट्याळ तितकीच हजरजबाबी मावशी म्हणजे जगन्नाथ शिंगवेकर, तर कधी विष्णू चासकर असत.
हाळीची गवळण, संपली की कृष्ण म्हणून राधाकिसन राहुरीकर किंवा निवृत्ती बुवा कुरणकर असत. निवृत्ती बुवा स्वतःची रचना स्वतः गात असत.तमाशा क्षेत्रात निवृत्ती बुवांसारखा सरदार मी तरी पाहीला नाही.
विनवणी व तक्रारी च्या तब्बल पाच गवळणी होत असत.दिडदोन तास पारंपरिक गण-गौळण चालत असे.ढोलकी,हालगी, टाळ,तुणतुणे व हार्मोनियम फक्त एवढ्याच वाद्यांचा समावेश त्यात असे.आर्गनसुद्धा त्यात नसे.

त्यानंतर रंगबाजीला सुरुवात होत असे. सुरुवातीला दोघे जण रंगमंचावर येत असत.त्यानंतर चढत्या क्रमाने विष्णू चासकर, गुलाबराव बोरगांवकर, दत्ता महाडिक अशी एन्ट्री होताना समोरच्या हजारो रसिकांच्या टाळ्यांनी आसमंत दणाणत असे.एकाचढ एक सोंगाडे व त्यांना हजरजबाबी प्रत्यूतर देणाऱ्या अक्काताई कराडकर असत.
(अशी स्त्री कलावंत होणे नाही. त्यांच्या नंतर ती भुमिका शशिकला सुक्रे यांनी खुप उंचीवर नेली .त्या स्वतः त्याकाळात म्याट्रिक शिकलेल्या होत्या !)

रंगबाजीमध्ये फक्त मराठी चित्रपटातील काही गाणी होत असत. प्रमुख गाणी म्हणजे महाडीक साहेब यांचीच असत.
महाडिक साहेब यांच्या एका गाण्यावर पब्लिकला ‘पैसे वसूल’ वाटत असे !उत्तम व दर्जेदार तितकेच नाविण्यपूर्ण विनोद व गुलाबराव बोरगांवकर यांचा हजरजबाबी संवाद व सांधे यामुळे रसिक प्रेक्षकांना दरवर्षी नवीन मेजवानी मिळत असे.

_असं म्हणतात की, महाडिक साहेब व गुलाब मामा यांनी आपल्या सोंगाडपणाची कधीच तालीम (रिहर्सल-रेशेल) आगोदर ठरवून केलेली नसायची. रंगमंचावरच त्यांच्या संवादातून उत्कृष्ट व नाविण्यपुर्ण विनोदनिर्मिती होत असे…!
तोपर्यंत रात्रीचे दोन वाजलेले असे.

आता वगनाट्याचा पुकारा होतो,
_…महाराष्ट्र झुकत नाही !_

छत्रपती संभाजी महाराज यांचा उत्तर आयुष्याचा इतिहास सदर वगनाट्यातून अत्यंत प्रभावीपणे दाखवला गेलाय.

थोरल्या महाराजांचे रायगडावर नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आली आहे.
थोरले महाराज गेल्यामुळे गोव्याचे पोर्तुगीज, दिल्लीचा मोघल औरंगजेब, मुंबईचे टोपीकर इंग्रज तसेच विजापुर सल्तनत या सर्वांचीच विखारी नजर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आसूसलेली आहे.
चोहोबाजूंनी शत्रू स्वराज्याचा घास घेण्यासाठी टपून6 बसला आहे.प्रत्यक्ष शहेनशहा औरंगजेब याने आपल्या लाखोंच्या फौजेला सोबत घेऊन दक्षिणेची वाट धरली आहे.आणि ह्या सर्व शत्रूंना छत्रपती संभाजी महाराज यांनी पाठीवर घेतलेले आहे..!

स्वतःच्या सख्या मेहूण्याने,गणोजी शिर्क्याने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना कोकणातील संगमेश्वर येथे मोघल सैन्याला सामिल होऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून दिले आहे…
मऱ्हाठ्यांचा छत्रपती त्या पापी औरंगजेबापुढे हातापायात साखळदंडानी बांधलेल्या अवस्थेत असूनही मोठ्या ताठ मानेने छाती पुढे काढून, समोर मृत्यू दिसत असूनही न डगमगता धीरोदात्तपणे ऊभा आहे…छत्रपती संभाजी यांच्या भुमिकेत नटसम्राट माधवराव गायकवाड तर औरंगजेबाच्या भुमिकेत नटश्रेष्ठ शंकरराव कोकाटे आपापले संवाद म्हणत आहेत….आणि समोरचा हजारोंच्या गर्दीत ते संवाद चालू असताना पिन-ड्रॉप सायलेन्स पसरलेली आहे…अभिनयाचा कळस म्हणजे काय, हे या प्रसंगात दिसून येते.

गायकवाड व कोकाटे यांचा अभिनय पाहून ज्यांना नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अभिनय गुरू म्हटले जाते ते प्रत्यक्ष प्रभाकर पणशीकर यांनी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दोघांची पाठ थोपटली होती.

आणि पुढे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात माधवराव गायकवाड यांची संभाजी ही भुमिका पाहून डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी ती भुमिका वठवली होती.वगनाट्य संपत आले,पुर्वक्षितीजावर सुर्योदयाची लाली पसरली होती, तरीही समोरच्या हजारो प्रेक्षकांमधून एखादे लहान मुलदेखील जागेवरून हलले नव्हते !!

आता गेले ते दिवस…असे दिवस पुन्हा पाहायला मिळतील की नाही हे माहित नाही.परंतू ते दिवस गेले म्हणून रडण्यात काही अर्थ नाही.

आता जर नवनवीन संकल्पना नवोदित कलावंतांनी आत्मसात करून त्यांचे प्रयोग तमाशात करून पाहायला काय हरकत आहे ?
सुरूवातीला होईल थोडं कमी जास्त,
पण मनापासून प्रयत्न केला तर यश नक्की मिळणार, ही शाश्वती नक्की ठेवायचीच…
🙏

✍🏻
-बाबाजी कोरडे
दि.23 जुलै 2024

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.