आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवती अमावस्या निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी!!

भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवती अमावस्या निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी!!

भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट!!

पुणे,नगर,नाशिक,मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या तिर्थक्षेत्र धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (२ सप्टेंबर) सोमवतीच्या निमित्ताने हजारो भाविकांनी गर्दी केलेली होती.

सकाळी ७ वाजता खंडोबा देवाच्या उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याने उगवत्या सूर्याच्या साक्षीने मंदिरातून देवमळ्यातील विहीरीवर शाहीस्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी भंडार खोबर्‍याच्या व फुलांच्या उधळणीत सदानंदाचा येळकोटचा जयघोष करण्यात आला. पारंपारिक वाद्याच्या व फटाक्याच्या आतषबाजीत सोमवती सोहळ्याला सलामी देण्यात आली.

हिंदू धर्माच्या पंचागानुसार श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पहाटे ५ वाजून २१मिनिटाने सोमवती अमावस्येचा प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी ७ वाजून २४ मिनिटापर्यत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने याच पर्वकाळात देवाच्या उत्सवमूर्तीना शाहीस्नानासाठी व पालखी सोहळ्यासाठी धामणी येथे पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केलेली होती.

सोमवारी पहाटे मंदिरातील सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर सकाळी वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी खंडोबा मंदिरात नेऊन मंदिरातील पंचधातूचा खंडोबा,म्हाळसाई व बाणाईचे सर्वांगसुंदर मुखवटे परंपरागत सेवेकरी भगत मंडळीकडून घेऊन ते वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर आणण्यात आले.सोमवतीच्या व देवाच्या मानाच्या काठीच्या मानकरी मंडळीच्या हस्ते लोकदेवाच्या मुखवट्याला सुवासिक चंदन पावडर गुलाबपाणी व पुदीन्याचे अत्तराचा लेप देऊन शाहीस्नान घालण्यात आले.

देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,शांताराम भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,माऊली जाधव वाघे,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,नामदेव पवार वीर,सुरेश पवार, राजेश भगत,धोंडीबा भगत,पांडुरंग भगत,राहूल भगत,खंडू भगत,नामदेव भगत या पंरपरागत सेवेकरी मंडळीनी खंडोबाची पूर्वकालीन सुरु असलेली पारंपारिक पूजा केली.

फुलांनी सजवलेल्या पालखीची गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सदानंदाचा येळकोट चा जयघोष करुन व फटाक्याची आतषबाजी करुन फुलांची व भंडार्‍याची उधळण करण्यात आली.यामुळे धामणीतील सोमवतीचा सोहळा चांगलाच रंगला असल्याचे भक्तांना पाहावयास मिळाले.

देवमळ्यातील विहीरीवर सोमवती स्नानाची पर्वणी साधण्यासाठीगावडेवाडी,महाळूंगे,गुंजाळवाडी,लांडेवाडी,तळेगाव,मरकळ,बेल्हे,नांदूर,कुरकूटवाडी,पाडळी,पारनेर,भराडी,फाकटे,कवठे,संविदणे,लोणी,खडकवाडी,पाबळ येथील हजारो भाविक जमलेले होते.

देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यासाठी महिला भाविकांची गर्दी लक्षणीय होती.उपस्थित सर्व भाविकांनी सोमवतीच्या शाहीस्नानाचा आनंद घेतला.सकाळी आठ वाजता खंडोबाचे शाहीस्नान झाले. त्यानंतर पूजा व महाआरती होऊन देवाच्या मुखवट्यावर फुले व भंडारा उधळण्यात आला.

त्यानंतर ग्रामस्थांच्या व देवस्थानाच्या वतीने सोमवतीचे मानकरी,देवाच्या काठीचे मानकरी,सेवेकरी व खांदेकरी आणि उपस्थित पंचक्रोशीतील भाविकांचा खेड,आंबेगांव,जुन्नर,शिरुर व पारनेर तालुक्यातील विविध आडनावाच्या कुळांचा सोमवतीची मानाची टाँवेल टोपी देऊन तर महिला भाविकांचा शाल श्रीफळ देऊन देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी देवस्थानाच्या “मल्हार” महाद्बाराच्या दोन्ही बाजूला बसवण्यासाठी दोन “जयविजय ची संगमरवरी शिल्पे अर्पण करणारे चांडोह (ता.शिरुर) येथील बबनराव अर्जुन भुमकर व ठाणे (मुंबई) येथील प्राचार्य राजाराम बबन विधाटे यांचा मानाचा फेटा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव,सरपंच रेश्मा बोर्‍हाडे, मा.सरपंच सागर जाधव,उपसरपंच अक्षय विधाटे,कांताराम तांबे,भगवानराव वाघ,मच्छिद्र वाघ,गणेश तांबे,डाँ.पाटीलबुवा जाधव,बाळासाहेब लालजी बढेकर,विठ्ठल बढेकर,बाळासाहेब महादू बढेकर,मिलींद शेळके,निलेश करंजखेले,वसंत जाधव,वामनराव जाधव,उत्तम जाधव,कैलास वाघ उपस्थित होते.

त्यानंतर सकाळी दहा वाजता उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात येऊन पालखीचे देवमळ्यातून शाही मिरवणूकीसाठी धामणीच्या पेठेत प्रस्थान झाले.सोमवतीच्या सोहळ्यात मानकरी पंचरास मंडळीच्या ताफ्यातील पारंपारिक वाद्यात दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत पालखीच्या पुढे पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार सजवलेला अश्व (घोडा) सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.दिमाखदार मिरवणूक वाजत गाजत दुपारी बारा वाजता मंदिरात स्थिरावली व पालखीतील देवाचे पंचधातूचे मुखवटे पारंपारिक सेवेकरी भगत मंडळीच्या स्वाधीन करण्यात आले.

सोमवतीला येणार्‍या भाविकांसाठी देवस्थानाच्या वतीने साबुदाना खिचडी व केळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यत दोन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे देवस्थानचे मुख्य पूजारी दादाभाऊ भगत यांनी सांगितले.

सकाळपासून दर्शनासाठी भाविक येत होते. दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्‍या भाविकांची संख्या मोठी दिसत होती.खोबरे भंडारा विक्रीची व फुलांच्या हाराची आणि पेढ्याची दुकाने मंदिराबाहेर थाटलेली दिसत होती.अधूनमधून येणार्‍या पाऊसामुळे भाविकांची धादंल उडाली. भाविकांच्या महाप्रसादाची सोय कुलस्वामी हाँल व जागरण देवकार्य सभामंडपात केलेली होती.भाविकांना शुध्द पिण्याचे पाण्याची चांगली सोय केलेली होती.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.