
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील एमबीए (व्यवस्थापन) विभागाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. संशोधन केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे. संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण उपलब्धी असून, समर्थ शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यापीठाच्या निर्धारित निकषांनुसार आवश्यक असणाऱ्या संशोधन सुविधा, शैक्षणिक पायाभूत व्यवस्था आणि अनुभवी संशोधन मार्गदर्शकांची उपलब्धता यांची पूर्तता केल्यानंतर एमबीए विभागाला ही मान्यता मिळाली आहे. या संशोधन केंद्रासाठी विभागात तीन मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शक कार्यरत आहेत. यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन व ऑपरेशन्स मॅनेजमेंट या विषयांसाठी डॉ. महेश भास्कर, ऑपरेशन्स मॅनेजमेंटसाठी डॉ. रुस्तुम दराडे आणि वित्तीय व्यवस्थापन या विषयासाठी डॉ. शशिकांत ताजणे यांचा समावेश आहे.
या संशोधन केंद्राच्या मान्यतेमुळे व्यवस्थापनशास्त्रातील विविध विषयांवर सखोल संशोधन करण्यासाठी संशोधकांना संस्थेमध्येच शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. विशेषतः मानव संसाधन व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, ऑपरेशन्स मॅनेजमेंट तसेच उद्योग आणि व्यवसाय व्यवस्थापनाशी संबंधित आधुनिक संकल्पना, समस्या व आव्हाने यांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यास चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित होण्याबरोबरच संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता, नावीन्यपूर्ण विचार आणि ज्ञाननिर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या औद्योगिक व व्यावसायिक वातावरणात व्यवस्थापनशास्त्रातील संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्योगक्षेत्रातील बदल, आधुनिक व्यवस्थापन पद्धती, मानवी संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि कार्यप्रणालीतील कार्यक्षमता या विषयांवर संशोधन करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधन परंपरेशी संलग्न राहून उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्याची संधी महाविद्यालयाला मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण मान्यतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, एमबीए विभागप्रमुख डॉ. महेश भास्कर तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार मानले. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व संबंधितांचे अभिनंदन करून पुढील संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या मान्यतेमुळे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून, अध्यापनाबरोबरच संशोधन आणि ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रातही महाविद्यालयाची वाटचाल अधिक सक्षम होणार आहे.





