मंगरूळ येथे पुरस्कार सोहळा संपन्न; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान..

मंगरूळ (ता.जुन्नर) येथील सेवाभावी संस्था स्वप्नवेध अनाथालय यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार सुनिल गहिने यांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

स्वप्नवेध अनाथालय हे गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ, निराधार मुलांच्या संगोपनासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेच्या वतीने समाजातील असे हिरे शोधून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
पत्रकारितेबरोबरच समाजसेवेचा वसा –
पत्रकार सुनिल गहिने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून, ती समाजातील वंचित, दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देऊन त्यांना बळ देण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

गरजू व्यक्तींच्या समस्या समाजासमोर मांडणे, लोकहिताच्या कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अनाथालय, वृद्धाश्रम, शाळा यांसारख्या संस्थांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देणे आणि प्रशासनाला जागे करणे, अशी महत्त्वाची भूमिका ते निस्वार्थपणे पार पाडत असतात.

सन्मानाचा क्षण –
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सुनिल गहिने यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून, निर्भीड, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा सन्मान आहे, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा समन्वय साधत कार्य करणाऱ्या सुनिल गहिने यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील सामाजिक कार्याला नक्कीच प्रोत्साहन देणारा आणि ऊर्जा देणारा ठरेल.
त्यांच्या या यशाबद्दल आज 24 तास, आंबेगाव तालुका पत्रकार संघ आणि सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

स्वप्नवेध अनाथालय, मंगरूळ येथे ‘समाजभूषण पुरस्कार’ स्वीकारताना पत्रकार सुनिल गहिने.
–
