
२९ वर्षांची परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि कलागुणांना वाव; नवव्या दिवशीच्या फॅशन शोचे विशेष आकर्षण
धामणी : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात सन १९९७ मध्ये सुरू झालेल्या युवा मित्र मंडळाने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारे हे मंडळ पंचक्रोशीतील पहिले आणि आदर्श मंडळ म्हणून ओळखले जाते. नवरात्रोत्सवातील दांडिया, विविध खेळ, फॅशन शो आणि ‘करुया स्त्रीजन्माचे स्वागत’ या उपक्रमांमुळे मंडळाचा उत्सव दरवर्षी विशेष आकर्षण ठरतो.

गणपती विसर्जन झाले की युवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. उत्सवाच्या नियोजनाची लगबग सुरू होते. सकाळ-सायंकाळ होणाऱ्या आरतीपासून ते सायंकाळच्या आरतीपूर्वी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध खेळांपर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले जाते. या उत्सवात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होतात.

दांडियाच्या तालावर वयाचे बंधनही विसरले जाते!
नवरात्रोत्सव म्हटले की दांडियाची रंगत आलीच. युवा मित्र मंडळाच्या दांडिया कार्यक्रमात लहान मुलांसोबत साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिकही तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. वयाची मर्यादा विसरून दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या ज्येष्ठांचा उत्साह पाहून उपस्थितांची बोटे आपोआप तोंडात जातात. वयापेक्षा मनातील उत्साह मोठा असतो, याची प्रचिती या कार्यक्रमातून येते.

नवव्या दिवशीच्या फॅशन शोची सर्वांनाच उत्सुकता
युवा मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवव्या दिवशी होणारा फॅशन शो. या कार्यक्रमात लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण सहभागी होतो. विविध वेशभूषा, अभिनय आणि कलागुणांच्या सादरीकरणातून प्रत्येक कलाकार आपले वय विसरून रंगमंचावर उतरतो. साठ वर्षांचे ज्येष्ठ असोत किंवा एखादा लहान मुलगा, प्रत्येकाच्या सादरीकरणात उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत असतो.

सन १९९७ मध्ये सुरू झालेले हे मंडळ पंचक्रोशीतील पहिले आणि आदर्श मंडळ मानले जाते. मंडळाच्या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक गावांमध्येही मंडळांची स्थापना झाली.

‘करुया स्त्रीजन्माचे स्वागत’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकी
युवा मित्र मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘करुया स्त्रीजन्माचे स्वागत’ हा उपक्रम. नवरात्रोत्सवाच्या काळात गावात एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर मंडळाच्या वतीने तिचे स्वागत केले जाते. त्या मातेची साडी-चोळीने ओटी भरून सन्मान केला जातो. तसेच तिला पाचशे रुपये रोख देऊन गौरविण्यात येते.

स्त्रीजन्माचे स्वागत करून समाजात मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा मंडळाचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
यंदाच्या फॅशन शोमध्ये विविध भूमिकांनी रंगत
कोरोनाच्या कठीण काळात दोन वर्षे नवरात्रोत्सवाचा आनंद घेता आला नाही. त्या काळात दांडिया, विविध खेळ आणि फॅशन शो यांसारख्या कार्यक्रमांना विराम मिळाला. त्यामुळे गावकऱ्यांसाठी ही दोन वर्षे उत्सवाविना सुनी-सुनी गेली.

यंदा मंडळाच्या तीसाव्या वर्षाच्या उत्सवात फॅशन शोचे विशेष आकर्षण होते. मंडळातील प्रत्येक कलाकाराने या कार्यक्रमात सहभाग घेतला. लहान मुलांनी साकारलेल्या नवनाथ आणि अजित पवार यांच्या भूमिका, नाना पाटेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कलाकारांनी सादर केलेला अभिनय, तसेच मनोज जरांगे पाटील यांची लक्षवेधी भूमिका यांमुळे कार्यक्रमात रंगत वाढत गेली.

शंकर-पार्वती यांच्या भूमिकांनी विशेष लक्ष वेधले. याशिवाय काही कॉमेडी सॉंग, तसेच हॉरर शो सादर करण्यात आले. विविध कलाप्रकारांनी सजलेल्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

शहरातील तरुणांना गावाच्या ओढीने पुन्हा एकत्र आणणारा उत्सव
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कामानिमित्त शहरात किंवा इतर ठिकाणी गेलेले अनेक तरुण आवर्जून गावाला येतात. नऊ दिवसांच्या उत्सवात सहभागी होऊन गावातील आनंदात रममाण होतात. फॅशन शोदरम्यान विविध वेशभूषा साकारताना कोणी इंजिनिअर असतो, तर कोणी व्यावसायिक. मात्र, रंगमंचावर उतरल्यानंतर प्रत्येकजण कलाकार बनतो.

या कार्यक्रमाच्या यशामागे केवळ रंगमंचावर सादरीकरण करणारे कलाकारच नसतात, तर पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचाही मोठा वाटा असतो. कलाकारांचा मेकअप करणे, गाणी ऑपरेट करणे, कलाकारांना मदत करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे अशी विविध कामे मंडळाचे कार्यकर्ते मनापासून करतात.

गावातील तरुण आणि कामानिमित्त बाहेर गेलेले तरुण एकत्र येऊन दरवर्षीच्या नवरात्रोत्सवाचे तसेच फॅशन शोचे नियोजन करतात. या नियोजनादरम्यान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा शहरातील धकाधकीच्या जीवनात मिळणाऱ्या आनंदापेक्षा वेगळाच असतो.

नऊ दिवसांचा आनंद आणि वर्षभराची आठवण!
नवरात्रोत्सव संपतो आणि दसऱ्याची चाहूल लागते. शहरात कामासाठी गेलेल्या तरुणांना पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचे वेध लागतात. मन शहराकडे वळते; मात्र पाय गावातून निघण्यास तयार होत नाहीत.
कारण या नऊ दिवसांत मिळालेला आनंद, मित्रांसोबत घालवलेले क्षण, रंगमंचावरील सादरीकरणे, दांडियाचा उत्साह आणि गावकऱ्यांसोबतचा सहवास हा शहरातील रोजच्या जगण्यात सहज मिळणारा नसतो.

गावाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटतात. पुन्हा गावाला येणे होईल, पुन्हा मित्र भेटतील; मात्र हा नवरात्रोत्सव, ही धामधूम आणि हा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार असते.

युवा मित्र मंडळ धामणीचा नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर गावातील माणसांना जोडणारा, नव्या-जुन्या पिढ्यांना एकत्र आणणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आनंदोत्सव आहे.
लेखक – अभिषेक वसंत बो-हाडे



