
पंचनामा प्रतिनिधी पिंपरी कावळ (ता. जुन्नर) – श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या माध्यमातून पिंपरी कावळ येथे एकल महिला नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जुन्नर तालुक्यातील विविध गावांमधील एकूण ३५ महिलांनी सहभाग घेतला.
पिंपरी कावळ, जांबुत, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे यांसह परिसरातील गावांमधील महिलांनी या मेळाव्यात उपस्थित राहून नावनोंदणी केली. विधवा, निराधार व घटस्फोटित महिलांसह नियमानुसार पात्र असलेल्या एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

नोंदणीकृत महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, कायदेशीर मार्गदर्शन व संरक्षण मिळवण्यासाठी मदत करणे, तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, यावर या उपक्रमात भर देण्यात आला.

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत पात्र महिलांची बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
या मेळाव्याचे आयोजन श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण संस्थापक अध्यक्ष. दीपक चव्हाण आणि पिंपरी कावळ मळगंगा बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती वनिता रोहिदास पाबळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

या उपक्रमासाठी पिंपरी गावचे पोलीस पाटील कृष्णा शिरतार, शरद भांबिरे, दिगंबर झिंजाड, लक्ष्मण भांबिरे, सुरज खिलारी सारिका पाबळे आणि मंदाबाई भांबिरे यांनी विशेष उपस्थिती व सहकार्य केले.




