सामाजिक

नाते कलेचे माझ्या रक्ताशी – लावणी सम्राज्ञी कै. शकुंतलाबाई नगरकर : महाराष्ट्राच्या लोककलेतील एक अजरामर पर्व !!

1011535174

लेखक : शाहीर खंदारे, ता. नेवासा

बालपणापासूनच कलेची ओढ

महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा अमूल्य ठेवा म्हणजे लावणी. या लावणी कलेला आपल्या अदाकारीने, नृत्याने, अभिनयाने आणि घुंगरांच्या निनादाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लावणी सम्राज्ञी कै. शकुंतलाबाई नगरकर यांचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

लावणी सम्राज्ञी कै. शकुंतलाबाई नगरकर या वाघोली, हवेली, पुणे येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या आईचे नाव छबुबाई काळे असे होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. शकुंतलाबाईंचा जन्म १६ मार्च १९५३ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आणि नाचण्याची आवड परमेश्वराने दिली होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांच्यातील कलेचे अंग प्रकट झाले.

त्यांच्या आईचा तमाशाचा फड ‘छबुबाई काळे’ या नावाने प्रसिद्ध होता. शकुंतलाबाईंनी आपल्या आईकडूनच नृत्याचे शिक्षण घेतले. शेवटी आईच मुलीची गुरु बनली. त्याचप्रमाणे मुंबईचे गुरुवर्य श्री. गोविंद निकम यांच्याकडूनही त्यांनी नृत्याचे शिक्षण घेतले होते.

तमाशाच्या फडापासून संगीत बारीपर्यंतचा कलाप्रवास

शकुंतलाबाईंच्या तमाशाचे आतापर्यंत जवळजवळ ३,००० पेक्षा जास्त जाहीर कार्यक्रम झाले होते. त्यांनी तब्बल तीस वर्षे स्वतःचा तंबूचा तमाशा सुरू केला होता. ‘छबुबाई काळे’ या नावाने हा तमाशाचा फड नावारूपाला आला होता.

तमाशाचा फड बंद झाल्यानंतर त्यांनी आर्यभूषण थिएटर, पुणे येथे संगीत बारी उभारली होती. आता शकुंतलाबाई बैठकीची लावणी आणि खडी लावणी यामध्ये अतिशय तयार झाल्या होत्या.

त्यांचा बाणेदारपणा म्हणजे नऊवारी साडी, हातभरून बांगड्या, केसांचा अंबाडा, नाकात नथ आणि पायात घुंगरू. हा नक्षीकांत पेहराव करून त्या रंगमंचावर आल्या की रसिक त्यांचे शिट्ट्यांच्या आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत होते.

ताल, स्वर आणि लय या त्रिवेणी संगमात त्या अतिशय तरबेज आणि तयार होत्या. त्यांचा नाचण्याचा ठंग, पायत्रा, अभिनय आणि अदाकारी ही काही परमेश्वराने त्यांना दिलेली देणगीच होती.

इतकेच नव्हे, तर ‘सखी माझी लावणी’ या नाटकातही त्यांनी भरपूर नाव कमावले होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत लावणी कलेचा गौरव

शकुंतलाबाईंना पुढील कार्यक्रमांमध्ये कोणाच्या हस्ते, कसे आणि किती पुरस्कार मिळाले, याचा गौरवशाली प्रवास सांगताना अनेक महत्त्वाच्या आठवणी जाग्या होतात.

१९९२ — अकलूज तमाशा महोत्सव

१९९२ साली अकलूज येथे तमाशा महोत्सव भरला होता. त्या ठिकाणी माननीय नामदार श्री. विजय सिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते शकुंतलाबाईंना एक नंबरचे बक्षीस मिळाले होते.

२००१ — पुणे विद्यापीठातील लावणीचा कार्यक्रम

२००१ साली पुणे विद्यापीठाचे डॉक्टर सतीश आळेकर यांनी विद्यापीठामध्ये शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता.

त्याच वर्षी नगरसेवक आबा बागुल यांनी नवरात्र उत्सवात लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन शकुंतलाबाईंचा मोठा सत्कार केला. हा पुरस्कार पंडित बिरजू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्यावेळी मंत्री मा. रामकृष्ण मोरे, मा. खासदार सुरेशभाई कलमाडी आणि उल्हास पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

२००२ — विलेपार्लेकरांचा लावणी महोत्सव

२००२ साली मुंबई येथे श्री. माधवराव खाडीलकर, संगीतकार श्री. सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्या सभागृहात विलेपार्लेकरांनी शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी सुधीर फडके यांनी उत्कृष्ट लावणी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि प्रशंसाही केली. हीच शकुंतलाबाईंच्या लावणीची खरी पावती ठरली. श्रीनिवास खळे यांचेही शकुंतलाबाईंना आशीर्वाद लाभले.

१६ फेब्रुवारी २००२ — दिल्ली येथे राष्ट्रपतींसमोर लावणी

१६ फेब्रुवारी २००२ रोजी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती के. नारायण हे सुद्धा हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम पंडित भास्कर चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला होता.

१८ फेब्रुवारी २००२ — पृथ्वी थिएटर्स, मुंबई

१८ फेब्रुवारी २००२ रोजी मुंबई येथील पृथ्वी थिएटर्समध्ये तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

५ जून २००२ — स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी

५ जून २००२ रोजी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी स्वतःच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

त्यावेळी पंडित भीमसेन जोशी यांनीसुद्धा त्यांना शंभर टक्के मार्क दिले.

२६ सप्टेंबर २००२ — गोरेगाव येथे देवानंद यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

२६ सप्टेंबर २००२ रोजी गोरेगाव येथे कैलासवासी मा. रामकृष्ण मोरे हे सांस्कृतिक मिनिस्टर असताना सिनेअभिनेते श्री. देवानंद यांच्या वाढदिवसानिमित्ताने शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख, संगीतकार नवशादजी, सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सेना आणि स्वतः माननीय रामकृष्ण मोरे हे हजर होते.

२९ नोव्हेंबर २००२ — संगीत नाटक अकॅडमी, दिल्ली

२९ नोव्हेंबर २००२ रोजी संगीत नाटक अकॅडमी संस्थेने दिल्ली येथे शकुंतलाबाईंच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरीत्या पार पडला.

२४ फेब्रुवारी २००३ — वाराणसी येथे पंडित बिरजू महाराज यांची शाबासकी

२४ फेब्रुवारी २००३ रोजी वाराणसी येथे पंडित बिरजू महाराज यांनी स्वतः लावणीचा कार्यक्रम आयोजित करून शकुंतलाबाईंना शाबासकी दिली.

१३ मे २००३ — भारतरत्न पंडित रविशंकर यांची उपस्थिती

१३ मे २००३ रोजी पंडित भास्कर चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून भारतरत्न पंडित रविशंकर उपस्थित होते. त्यांनीसुद्धा शकुंतलाबाईंची खूप वाहवा केली.

४ ऑगस्ट २००३ — इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

४ ऑगस्ट २००३ रोजी आय.सी.सी.आर.च्या वतीने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने गाजला.

१५ एप्रिल २००४ — भारताच्या उपराष्ट्रपतींसमोर लावणी

१५ एप्रिल २००४ रोजी भारताच्या उपराष्ट्रपतींसमोर लावणीचा कार्यक्रम करून दिल्लीमध्ये आझाद भवन येथे भरगच्च रसिकांच्या समोर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तेथेही रसिकांनी शकुंतलाबाईंना खूपच शाबासकी दिली.

गुरु-शिष्य परंपरेतून लावणी कलेचा वारसा

२००५ साली सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, उदयपूर यांच्या वतीने लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गुरु-शिष्य परंपरेने बैठकीच्या लावणीचे प्रशिक्षण देण्यासाठी शकुंतलाबाईंची नियुक्ती करण्याचे ठरवण्यात आले.

त्या ठिकाणी दोन वर्षांसाठी बैठकीच्या लावणीसाठी गुरु या नात्याने शिष्यांना शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे होणारा संगीत महोत्सव, माननीय अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांनी शकुंतलाबाईंचा लावणीचा कार्यक्रम ठेवून शनिवारवाडा येथे भव्यदिव्य कार्यक्रम पुणेकर रसिकांना बघण्यास मिळाला.

त्यांचा ‘सखी माझी लावणी’ मधु कांबीकर यांच्या कार्यक्रमांमध्येही प्रमुख सहभाग होताच.

२००९ — संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित

२००९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शकुंतलाबाईंनी पटकावला.

शकुंतलाबाईंनी आता ‘संगीत बारी’ नावाच्या कार्यक्रमातून पारंपरिक लावण्या सादर करण्याची हमी पत्करली होती. हे कार्यक्रम मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू आणि लवकरच दुबई व लंडन येथे सादर करणार होत्या. हीच त्यांची इच्छा होती.

‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात प्रशिक्षकाची भूमिका

२०१६ आणि २०१७ या दोन वर्षी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाची प्रशिक्षक भूमिका शकुंतलाबाईंनी पार पाडली.

दरवर्षी त्या कार्यक्रमात हे काम करणार, अशी जिद्द त्यांनी मनात बांधली होती.

त्या म्हणतात की, “लावणीचे वर्कशॉप काढून या कार्यक्रमात वयाच्या सोळा वर्षांपासून ते ६० वयाच्या स्त्रिया भाग घेऊन मी त्यांना लावणी शिकवते. याचा मला मनापासून आनंद वाटतो.”

असे त्यांचे उद्गार होते.

ही कला सादर करण्यासाठी शकुंतलाबाईंचे लावणीला आणि त्यांच्या घुंगराला खूप मोठे योगदान आहे.

रसिकांची सेवा हाच आनंद

रसिकांची सेवा करणे, यातच त्यांना खूप आनंद वाटत असे. परमेश्वर मोजक्याच लोकांना कला अवगत करतो. त्यातीलच हा एक प्रकार आहे.

शकुंतलाबाईंचे वर्णन करावे तेवढे कमीच!

त्यांनी वयाच्या ४५ वर्षांपर्यंत रसिकांची सेवा करून महाराष्ट्राच्या या पारंपरिक लावणीला जिवंत ठेवले आणि उभ्या महाराष्ट्रात आपले नाव झळकवले.

त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातल्या पवित्र भूमीत झाला. हे किती मोठे भाग्य आहे! आपले नाव रसिकांच्या ओठावर ठेवले. खरंच, अशा महान लावणी सम्राज्ञी आपल्या या भारतमातेच्या भूमीत जन्माला येऊन ही पारंपरिक लोककला अजरामर ठेवावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

अखेरचा निरोप… घुंगरांचा निनाद कायमचा थांबला!

आणि शेवटी २२ सप्टेंबर २०२६ रोजी शकुंतलाबाईंनी अखेरचा श्वास घेतला आणि डोळे बंद केले ते कायमचेच…

तिथेच त्यांच्या लावणीचा आणि घुंगरांचा प्रवास थांबला.

शेवटी हा जगाचा मायारूपी पिंजरा सोडून त्या परलोकी निघून गेल्या.

लावणीच्या रंगमंचावर आपल्या नृत्याने, अभिनयाने, अदाकारीने आणि घुंगरांच्या निनादाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान कलावंताने कायमचा निरोप घेतला.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेतील एक तेजस्वी पर्व संपले आहे. मात्र, त्यांच्या कलेचा सुगंध, घुंगरांचा निनाद आणि लावणीतील त्यांची अदाकारी रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहील.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

हीच जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना…

भावपूर्ण श्रद्धांजली!

लेखक : शाहीर खंदारे
तालुका : नेवासा

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503

Related posts

समर्थ गुरुकुलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी !!

Chief Editor

काठापूर बुद्रुकमध्ये बिबट्या मादी जेरबंद !!

Chief Editor

पंचनामा विशेष – जागतिक कोल्हा दिन !!

Chief Editor

Leave a Comment