
होम-हवन, दुर्गापूजा व महिलांची महाआरती; ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन
जारकरवाडी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे श्री कळमजाई माता वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त मंदिरात होम-हवन, दुर्गापूजा तसेच महिलांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक विधींमध्ये ग्रामस्थ व महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सोहळ्यानिमित्त सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणपूरक उपक्रमातून गावाचा आदर्श !!
या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. महाप्रसादाच्या जेवणासाठी पारंपरिक पत्रावळीऐवजी स्टीलच्या एक हजार ताटांचा व ग्लासांचा वापर करण्यात आला. पत्रावळीच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा पर्यावरणपूरक निर्णय घेण्यात आला. धार्मिक परंपरेसोबतच निसर्ग संवर्धनाची जाणीव जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गावाला समृद्ध धार्मिक परंपरा व ऐतिहासिक वारसा !!
जारकरवाडी गावाला मोठी धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावचे ग्रामदैवत आई वडजादेवीच्या मंदिरात दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. तसेच बिरोबा महाराज मंदिर परिसरातही नवरात्रोत्सव धार्मिक पद्धतीने संपन्न होतो. दसरा सणालाही गावात विशेष महत्त्व असून, विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थ आपली परंपरा जपत आहेत.

गावातील पांडुरंग मंदिर परिसरात प्राचीन कोरीव लेणी असून, प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाई यांच्या हस्ते शिवलिंगाची निर्मिती झाल्याची धार्मिक आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या परिसराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गावाचा हा समृद्ध वारसा भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान ठरत आहे.


शेतीला बारमाही पाण्याचा आधार !!
धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेसोबतच गावाला शेतीचीही समृद्ध पार्श्वभूमी आहे. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी गावाला बारमाही उपलब्ध होत असल्याने शेतीला मोठा आधार मिळतो. सिंचनाच्या सुविधेमुळे परिसरात विविध नगदी पिके घेतली जातात. त्यामुळे शेती हा गावाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार ठरला आहे.




कळमजाई माता वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांनी धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणला. गावाची धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपत पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
