
औषधोपचारांसोबत प्रेम, आपुलकी आणि मानसिक आधारही महत्त्वाचा; समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘दीक्षारंभ २०२६’ उत्साहात !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग, बेल्हे (बांगरवाडी) येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘दीक्षारंभ २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. आकाश आवारी यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून नर्सेसची भूमिका स्पष्ट केली. रुग्णाला औषधोपचारांबरोबरच प्रेम, आपुलकी, विश्वास आणि मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. आवारी म्हणाले की, रुग्णाच्या आजाराचे निदान करून डॉक्टर उपचारांची दिशा निश्चित करतात; मात्र उपचारांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णाची नियमित काळजी, प्रकृतीतील बदलांचे निरीक्षण आणि वेळेवर औषधोपचार यामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आजारपणात रुग्ण शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक तणावातूनही जात असतो. अशा वेळी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधणे, त्याला धीर देणे आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही नर्सची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचा मार्ग आहे.
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी शिस्त, अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन, संवादकौशल्य आणि सेवाभाव हे गुण आत्मसात करावेत. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व उपचारपद्धती यांचे ज्ञान अद्ययावत ठेवावे. रुग्णाची सामाजिक, आर्थिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी विचारात न घेता प्रत्येकाला समानतेने आणि संवेदनशीलतेने सेवा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य बाबासाहेब भुतकर यांनी प्रास्ताविकातून ‘दीक्षारंभ २०२६’ या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षण, महाविद्यालयीन शिस्त, व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि आरोग्यसेवेतील विविध संधींची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य बाबासाहेब भुतकर, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ, यशवंत फापाळे, डॉ. शरद पारखे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.निखिल कणसे, हर्षदा शिंदे, वैष्णवी बर्वे, स्वप्नाली गायकवाड, स्नेहल येवले,प्रा.कांचन साबळे यांनी केले.सानिया शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर हर्षदा गोफने यांनी आभार मानले.
नर्सिंग क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि सेवाभाव यांची सांगड घालून सक्षम व संवेदनशील आरोग्यसेवक घडविण्याच्या दृष्टीने ‘दीक्षारंभ २०२६’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




