
पंचनामा प्रतिनिधी पारगाव – धामणी (ता. आंबेगाव) येथील किरण दत्तात्रय जाधव यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल १७ वर्षे देशसेवा बजावून नायक पदावरून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मायभूमीत परतले. त्यांच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील किरण जाधव यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. सप्टेंबर २००९ मध्ये ते भारतीय सैन्यदलात जवान म्हणून दाखल झाले. जम्मू, मध्यप्रदेश, डेहराडून, मिझोराम, जालंधर यांसह विविध ठिकाणी त्यांनी देशसेवा बजावली. १७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते मायभूमीत परतले.
ग्रामस्थांनी वाजतगाजत काढलेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या सत्कार समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच प्रतीक्षा जाधव यांच्या हस्ते किरण जाधव, त्यांच्या पत्नी, आई व वडील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, उपसरपंच अक्षय विधाटे,भाऊसाहेब करंडे, बी. टी. बोऱ्हाडे माजी सरपंच सागर जाधव, रेश्मा बोऱ्हाडे, संदीप तांबे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन चाडदरा वस्तीतील तरुण मंडळाने केले.


