Uncategorized

समर्थ आयटीआयमध्ये नव्याने प्रवेशित प्रशिक्षणार्थींचे स्वागत व माजी प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा !!

1011187005

गुणवत्तेसोबत प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक – रत्नाकर दरेकर

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ आयटीआय बेल्हे येथे नव्याने प्रवेशित प्रशिक्षणार्थींचे स्वागत तसेच माजी प्रशिक्षणार्थींच्या गुणगौरवाचा सोहळा उत्साहात पार पडला. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विविध ट्रेडमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींचे यावेळी स्वागत करण्यात आले. तसेच संस्थेतील उच्च गुणवत्ताधारक प्रशिक्षणार्थींचा आणि अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत ट्रेडनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी प्रशिक्षणार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड, आंबेठाण, पुणे येथील हेड ऑपरेशन्स माननीय श्री. रत्नाकर दरेकर तसेच एक्साइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, एमआयडीसी, अहिल्यानगर येथील एच.आर. असिस्टंट मॅनेजर माननीय श्री. आकाश आल्हाट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते गुणवंत प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना रत्नाकर दरेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक गुणवत्ता आणि चांगले गुण निश्चितच महत्त्वाचे आहेत; मात्र त्यासोबतच प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनत, महत्त्वाकांक्षा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करावेत. औद्योगिक क्षेत्रात ज्ञानासोबतच सकारात्मक दृष्टिकोन, कामाप्रती निष्ठा आणि शिस्तीला मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. या गुणांच्या बळावर प्रशिक्षणार्थींनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आकाश आल्हाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून व्यावसायिक व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आयटीआयमधून मिळणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रासाठी तयार करते. विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणाच्या संधींचा पुरेपूर उपयोग करून विविध कौशल्ये विकसित करावीत. कौशल्याच्या बळावर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना संस्थेच्या शैक्षणिक व औद्योगिक प्रशिक्षणाची माहिती देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. त्यांच्या यशामुळे विद्यमान प्रशिक्षणार्थींनाही प्रेरणा मिळाली.

समर्थ आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, शिस्त, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शन दिले जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

 गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
1011111248

Related posts

कारखाना साखर शाळेसाठी दोन वर्गखोल्या मंजूर; २८ लाखांचा निधी, ऊस कामगारांच्या मुलांना दिलासा !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे ने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली अनोखी संकल्पना!!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद!!

Chief Editor

Leave a Comment