
पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) : गावातील बेकायदेशीर खडी क्रशर बंद करावेत तसेच बेकायदा उत्खननप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी लोणी येथे सोमवारी (दि. ५) ग्रामपंचायत कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. सुखदेव आढाव, सखूबाई आढाव, विकास आढाव, धनश्री आढाव आणि गुलाब गायकवाड हे उपोषणाला बसले आहेत.
लोणी गावातील बेकायदेशीर खडी क्रशर तातडीने बंद करावेत, बेकायदा उत्खननप्रकरणी कठोर कारवाई करावी, खोट्या व बोगस ग्रामपंचायत ठरावाच्या आधारे मिळविलेले प्रदूषण मंडळाचे परवाने रद्द करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, दोषी व्यक्तींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
या प्रकरणासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरावे देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे बाधित शेतकरी सुखदेव आढाव यांनी सांगितले.

लोणी (ता.आंबेगाव) येथे बेकायदेशीर खडी क्रशरविरोधात आमरण उपोषणाला बसलेले बाधित शेतकरी
