
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त वन्यजीव पोस्टर स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने ‘मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जुन्नर येथील माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची किंवा वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगत त्यांनी पर्यावरण आणि मानवी जीवनातील परस्परसंबंध स्पष्ट केला.
सैन्यदलात सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या खरमाळे यांनी वनरक्षक म्हणून पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. जलसंधारणासाठी श्रमदानातून जलशोषक चर, पाणवठे, वृक्षसंवर्धन, बीजप्रसार, वनवा प्रतिबंध, वन्यजीव रेस्क्यू तसेच प्लास्टिकमुक्त अभियान अशा विविध उपक्रमांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या पर्यावरणीय कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून, विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी पाणी वाचविणे, वृक्षांचे संवर्धन करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खरमाळे यांनी केले. “पर्यावरण वाचविणे म्हणजे केवळ झाडे वाचविणे नव्हे; तर भविष्यातील मानवाचे अस्तित्व सुरक्षित करणे होय,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, विभाग प्रमुख डॉ. सचिन दातखिळे, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, विभाग प्रमुख प्रा. नितीन महाले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सागर तांबे यांनी केले, तर आभार योगिता शिंदे यांनी मानले.


