
आपलं आयुष्य म्हणजेच एक “Visiting कार्ड” आहे आणि आपले बाबा म्हणजेच आपल्यासाठी ते “PAN कार्ड” व आधार कार्ड..!!” आहेत.
“बाप” म्हणजे काय तर तो आपल्या जगण्याचं “माप” असतो..पाठीवरील कौतुकाची “थाप” असतो..ह्रदयाची “धाप” असतो..बाप हा बापच असतो.. “समुद्राची केली श्याही अन् पर्वताची केली लेखनी तसंच त्या आकाशाचा केला कागद तरीपण ज्याचं वर्णन करता येणार नाही..असं जर कोणतं व्यक्तित्व असेल तर तो “बाप” असतो.. तो बाप च असतो..!! बाप म्हणजे काय? एक शब्द, दोन अक्षरे पण त्यात खरंच सारं आयुष्य सामावलेलं असतं. बाप कधी मोठ्याने प्रेम सांगत नाही, पण त्याच्या प्रत्येक कृतीत प्रेम दिसतं. उन्हातान्हात राबणारे हात.., रात्री जागून काळजी करणारे डोळे, आणि मुलांसाठी स्वतःच्या स्वप्नांना विसरणारं मन–हाच खरा बाप असतो. बाप होणं इतकही सोप नाही कारण आयुष्यभर झिजावं लागतं. आणि तरीही मागे उरावं लागतं..स्वतःच्या ईच्छेच्या राखेवर दुसर्याचं स्वप्न जगावं लागतं..सुखाचा वारा आणि दुःखाच्या पावसाला छत बनून झेलावं लागतं..आणि त्यासाठी बाप च बनावं लागतं..! त्याने खाल्लेल्या खस्ता आपण खाऊ नयेत म्हणून तो आपल्या जीवाचं रान करतो….आणि प्रत्येक अडचणीत मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो बाप असतो.. असा हा बाप नावाचा कल्पवृक्ष आयुष्याभराचे संस्कार देतो.. पंखात बळ देतो,अन आपल्या आयुष्याला नवीन दिशा देतो..!
आपण आईबद्दल खूप बोलतो, गुणगान गातो. पण बापाबद्दल बोलायला मात्र शब्दच कमी पडतात. कारण बाप बोलत नसतो, तो कृती करतो. त्याचं प्रेम शांत असतं, खोल असतं, दिसत मात्र नसतं..आई ही जर मायेची सावली असेल तर बाप सावली देणारं झाड असतो, त्या कुटुंबासाठी प्रकाश दाखवणारी अंधारातील तो समई असतो..
सगळेच म्हणतात वेड्या आईची वेडी ही माया..खरंतर बापच असतो सर्व कुटुंबाचा एक मजबूत आणि कणखर पाया..!
जर पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत आणि टिकाऊ राहील..बाप पाठीमागे असला की आपली भीती मरते.., मग ती सायकल चालवायची असो अथवा आयुष्य जगायची..
कुटुंबासाठी आपल्या बाबा राबतो दिवस रात्र..देह झिजतो त्याचा, जळते जशी दिव्याची मंद वात..! बाप नावाची गादी व आई नावाची ऊशी एकदा का आयुष्यातून हरवली तर कधीच सुखाची झोप लागणार नाही.. गर्भातून या जगात आणणारी ती “आई” आणि या जगातून “माणसात” आणणारा व माणूस बनण्याचे धडे देणारा तो बाप च असतो..आधाराची सावली आणि मायेचा तो ओलावा असतो..!
बाप नावाचं नातं खूप खास आहे. तो आपल्यासाठी खूप काही करतो पण कधी सांगत नाही. त्याचं प्रेम शांत असतं, खोल असतं. आपण त्याला समजून घ्यायला हवं, त्याला वेळ द्यायला हवा. जर तो तुमच्याबरोबर असेल तर आज त्याला भेटा, त्याच्याशी बोला. जर तो नसेल तर त्याच्या आठवणी मनात जपा.
बाप म्हणजे असं नातं जे कधी सरत नाही अन् उरतही नाही. तो असो वा नसो, तो कायम आपल्या मनात असतो, आपल्या आठवणींत असतो. आई ही दिवसभर घरात असते त्यामुळे तिचे प्रेम सर्वांनाच दिसते..पण बाप हा दिवसभर घराबाहेर राहून कुटुंबासाठी कष्ट करतो…त्यामुळे अनेकदा आपल्या मुलाच्या नजरेतून त्याचे कष्ट दुर्लक्षित राहतात..! आपल्या लेकरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वतःचे प्रत्येक स्वप्न तो विसरून जातो, जेंव्हा पाहीले मी तळहात..! बाप माझा माझ्यासाठी जसां देवच होऊन जातो..!
आईकडे असतील जरी अश्रूंचे पाट, बाप मात्र असतो संयमाचा घाट..आपल्या सर्वांना आठवते जेवण बनवणारी आई..पण त्या शिदोरीची सोय ही बाप च तर पाही..!
“जिजाऊ नि शिवबांना घडवले हे खरेच असले तरीपण त्याच वेळी शहाजी राजांची ओढाताण लक्षात घ्यायलाच हवी”..”देवकी अन् यशोदेच प्रेम मनात जरुर साठवावे.. त्याचवेळेसच टोपलीतून बाळाला नेणारे वासुदेव पण आठवावेत..!” “रामासाठी कौसल्येची झाली असेल कसरत..पुत्र वियोगाने मरण पावला बाप दशरथ..” काटकसर करून मुलास देतो तो पाॅकेटमनी.. आपण मात्र वापरतो पॅन्ट जूनी.
मी अन् माझा बाप’, या आत्मचरित्राबद्दल बोलताना निळूभाऊ मराठी साहित्याच्या बाबतीत म्हणाले होते की, ‘साने गुरुजींनी महाराष्ट्राला आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी बाप!’ असा बाप फार कमी जणांनी शब्दबद्ध केला आहे. ‘आई एक नाव असत. घरातल्या घरात गजबलेल गाव असत!’, ही फ. मु. शिंदेंची कविता तोंडपाठ असणारे बरेचजण भेटतील. पण ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ सांगणारा एखादा संदीप खरे हवाच असतो..आत्ताच करोना संसर्गाच्या काळात अनेक बापांचं हतबल होणं डोळ्यासमोर दिसत आहे. लहान मूल रडत असेल तर त्याला दूध पाजण्याइतकं का होईना इंद्रियांच वरदान निसर्गाने स्त्रीला दिले आहे. पण स्वतःच मूल भुकेने रडत असताना त्याला खायला आणून देण्यासाठी खिशात पैसे नाहीत म्हणून हुंदका आतल्या आत दाबणारे बापसुद्धा आज अस्तित्वात आहेत. मुलीच्या लग्नाच्या विवंचनेत आणि मान-पानाच्या वृथा कल्पनांच्या व समाजमान्य रुढींच्या दबावापायी मृत्यूला जवळ करणारे हतबल, अगतिक बापसुद्धा आपण पाहिले आहेत. आपल्या मुलाला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चोरपावलांनी घरात येणारा आणि कडेवर येऊ पाहणाऱ्या मुलांना टाळून त्यांच्या जीवाची काळजी घेणारा अत्यावश्यक सेवेत काम करणारा बाप आज कोणत्याही आईपेक्षा कमी नाही.वडीलांच्या टाचा झिजलेल्या चप्पलांकडे बघितल की त्यांच खरं प्रेम कळतं.त्यांच ते फाटक बनियन बघितल की कळतं की आमच्या “नशीबाची भोकं” त्यांच्या बनियनला पडलीत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा हा त्यांची काटकसर दाखवतो.कोणत्याही मंगल प्रसंगात घरातील सर्वजण जातात पण मयताच्या प्रसंगात बापालाच जावे लागते..मुलाच्या नोकरी साठी लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवत फिरणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडवणारा बाप..खरंच कीती ग्रेट असतो ना..?
वडीलांच महत्व खरंच कोणाला कळतं? वडीलांना समजून घेते ती त्या घरातील मुलगी..सासरी गेलेल्या मुलीला फोनवर बोलताना बापाचा बदललेला आवाज लगेच लक्षात येतो.. मुलगी जशी बापाला समजून घते, जाणते इतरांनी पण् तसंच आपल्याला समजून घ्यावं एवढीच इच्छा त्या बापाची असते..!
साहित्य, चित्रपट, गीत, संगीत सगळीकडे बाप असण्याच्या या छटा अपवादानेच कोणी शब्दांत बांधल्या असतील. त्यामुळे ‘फादर्स डे’ जवळ आला की आपसुकपणे ओठावर ‘बाबा मला कळलीच नाही, तुझ्या मनीची वेदना..’ हे गीत येते.
शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की ” देह पार भिजला तरीही जाऊन तो निजला! झिजला असू दे कितीही तरी बाप हा आपल्यासाठीच “राबला”..!”
आपल्यासाठीच “राबला”..!!
श्री.निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर…
छ.संभाजीनगर-४३११३६
मो. नं-९८८१०८४३२०





