
पंचनामा प्रतिनिधी जुन्नर : वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग, जुन्नर यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त निसर्गप्रेमी, विद्यार्थी, छायाचित्रकार आणि नागरिकांसाठी विविध स्पर्धा, निसर्ग भ्रमंती, पक्षी निरीक्षण तसेच निसर्गविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ऑनलाइन छायाचित्र स्पर्धा, निसर्ग कविता कट्टा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ऑनलाइन छायाचित्र स्पर्धेसाठी जुन्नर तालुक्यातील निसर्ग, पशुपक्षी, फुलपाखरे, कीटक, वनस्पती आदी विषयांवरील छायाचित्रे स्वीकारली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे ५ ऑक्टोबर २०२६पर्यंत पाठवायची आहेत. छायाचित्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३० सप्टेंबरपूर्वी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन
२ ऑक्टोबर : सकाळी १० वाजता डॉ. अलेक्झांडर गिब्सन स्मारक, हिवरे गार्डन, येडगाव येथे ‘निसर्ग कविता कट्टा’ आयोजित करण्यात आला आहे. सहभागी कवींनी निसर्गविषयक कविता सादर करावयाच्या आहेत.
३ ऑक्टोबर : सकाळी १० वाजता शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर येथे चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी लहान गट (इयत्ता १ ते ४), मोठा गट (इयत्ता ५ ते ८) आणि खुला गट (इयत्ता ९ ते १२ व पुढील) असे गट करण्यात आले आहेत.

४ ऑक्टोबर : सकाळी ७ वाजता वनविश्रामगृह, शिवनेरी पायथा, जुन्नर येथे निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निसर्ग व्याख्यानमालेत विविध विषय
वन्यजीव सप्ताहादरम्यान १ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत निसर्ग व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘जुन्नरमधील पक्षी वैभव’, ‘वनवा व्यवस्थापन व पर्यावरण संरक्षण’, ‘जुन्नर जैवविविधता आणि सहजीवन’, ‘निसर्ग भ्रमंती व पक्षी निरीक्षण’, ‘साप समज आणि गैरसमज’ तसेच ‘पश्चिम घाटातील वनस्पती व पर्यावरण’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुरण येथे ‘बिबट आख्यान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून बिबट्या आणि त्याच्या अधिवासाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे
विविध स्पर्धांमध्ये प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन्यजीवांचे संरक्षण, जंगलांचे संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात जुन्नर तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभाग जुन्नर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : ७४९८६९३१७४, ७७०९९९७८३०.


