
पंचनामा प्रतिनिधी समीर गोरडे
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या विज्ञान आधारित पोषण व कृषी निविष्ठा व्यवस्थापन जनजागृती अभियानांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे यांच्या वतीने खेड तालुक्यातील बुरसेवाडी येथे शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात जवळपास पन्नास अधिक शेतकरी बांधव सहभागी झाले असून त्यामध्ये २० महिला शेतकऱ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात बिबी ग्राम सोसायटीचे अध्यक्ष श्री. साईनाथ चंदावले यांच्या परिचयपर भाषणाने झाली. त्यानंतर सरपंच सौ. संगीता ताई तनपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमास गावातील विविध मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. भूषण आर. बिबवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी कांदा व लसूण पिकामध्ये संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मातीची हानी, कीडरोगांचा प्रादुर्भाव, पर्यावरण प्रदूषण व आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शैलेंद्र एस. गाडगे, प्रधान शास्त्रज्ञ यांनी कांदा उत्पादनवाढीसाठी विकसित तंत्रज्ञानाची माहिती देत शाश्वत पोषण व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच एससीएसपी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. अमरजीत गुप्ता, प्रधान शास्त्रज्ञ यांनी हंगामानुसार सुधारित जातींची निवड, बीजप्रक्रिया, संतुलित खत वापर आणि शाश्वत पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच मृदा परीक्षणासाठी माती नमुना संकलनाची योग्य पद्धत समजावून सांगत मृदा परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात वैज्ञानिक कांदा साठवण तंत्रज्ञानाबाबतही जनजागृती करण्यात आली. साठवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पावडरचा वापर टाळून सुरक्षित व नैसर्गिक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शेतकरी, शेतकरी गट व एफपीओंना कांदा प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी उपलब्ध सुविधा जाणून घेण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.


