सामाजिक

इंदू –

img 20260523 wa0418

लेखन :बाळासाहेब मेदगे
औदर (राजगुरुनगर)

लेखन :बाळासाहेब मेदगे
औदर (राजगुरुनगर)
9004564645

         इंदू चा जन्म मुळातच  गावाकडे झाला होता.एकोणिशे बाहत्तर मध्ये इंदू ज्या घरात जन्माला आली ते घर म्हणजे अठरा विश्व दारिद्र्याने पिचलेले घर होते.आई बाबाकडे पुरेशी शेती नव्हती.दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून कसा बसा संसार चालला होता.इंदू ला अजून दोन  थोरली भावंडे होती.ती  सर्वात धाकटी होती.इंदूची आई जरी गरीब घरातील होती खरी तरी  पण तिचे विचार खूप प्रगल्भ होते.आपल्या मुलांनी शाळा शिकून चांगली नोकरी करावी असे तिला मनोमन वाटत होते.

मुलांना जीवन शिक्षण मंदिर या शासनाच्या शाळेत पाठवले होते. पाटी आहे तर पेन्सिल नाही अशा बिकट परिस्थितीत या सर्व मुलांचे शिक्षण चालू होते.इंदूने सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.पुढील शिक्षणासाठी ऐपत नसलेल्या तिच्या आईने तिला घरीच ठेवले होते.घरी राहिल्यानंतर घरात असणाऱ्या एक दोन गायींच्या चरण्याची जबाबदारी तिच्या वर येऊन पडली होती.कारण दोन्हीही भाऊ माध्यमिक शिक्षण घेत होते.गायी चारून आल्यानंतर घरातील भांडी घासणे,विहिरीवरून पाणी आणणे,घरात वेळेप्रसंगी जेवण बनवणे अशी सगळी कामे तिला करावी लागत होती.

        इंदू जशी जशी मोठी होत गेली तशी तशी ती समंजस होत चालली होती.सणासुदीला घरात कोणत्या परंपरा जपायच्या याचे तिला तिच्या आईकडून बाळकडू मिळू लागले होते. तिची आई तिला नेहमी सांगत असे

माणुसकी घरातील तिजोरी आहे,
गोड शब्द घरातील धनदौलत आहे,
शांतता घरातील लक्ष्मी आहे,
समाधान तेजस्वी समई आहे,
आणि
प्रेम हाच घराचा पाया आहे. असे विचार तिच्या कानावर आदळू लागले होते.
आईची प्रत्येक कामात तिला मदत मिळत असल्याने शेती आणि घर यामधील सगळ्या प्रकारची कामे तिला जमू लागली होती.इंदुला कपडे कधी ही चांगली भेटली नव्हती.कधी कधी ठिगळ लावून परकर घालावा लागत होता.ज्यावेळी ती तिच्या आईबरोबर दुसऱ्याच्या शेतात जायची त्यावेळी पोर वय असल्याने पोटात खूप भूक लागत असायची , पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना ती नम्रपने सांगत असायची थोडा वेळ वाट पहा आणि मग सामुदायिक जेवताना ते कावळे ओरडायचे बंद होत होते. दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करताना घामाघूम झालेली इंदू मात्र आपले दुःख कुठेच सांगत नव्हती एव्हाना आई पर्यंत हे जाऊन न देण्याची ती खबरदारी घेत होती.

     सोळावं वरीस धोक्याचे बाई या चित्रपटातील गीताप्रमाणे इंदू सोळाव्या वर्षात पोहचली होती.तिची आई मात्र नेहमी याच चिंतेत असायची की पोरीच लग्न करायचे तर चांगले स्थळ हवं कारण तिला स्वतःचे आयुष्य तिच्या डोळ्यासमोर येत होते. कपाळाचे बाशिंग सुटल्यापासून तिच्या आईने या संसारासाठी खूप खस्ता खाल्ल्या होत्या.

       इंदूला तीन चार स्थळ चालून आली होती.पण ती स्पष्ट तिच्या आईने नाकारली होती.नात्यातील एक स्थळ तिला आवडले आणि एक वर्षभराच्या अंतराने इंदूचे लग्न झाले होते.लग्न होत असताना इंदूच्या चुलत्यांना पूर्ण विश्वासात घेऊन त्या माऊलीने  हे लग्न उरकले होते.घरातील या पिढीचे पहिलेच लग्न असल्याने सगळ्यांनी लक्ष घालून या लग्नाचा आनंद घेतला होता.विशेष करून इंदू ची आत्या हिने बरेच लक्ष घालून हा विवाह सोहळा पार पाडला होता.

     लग्न झाल्या नंतर इंदू सासरी आली त्यावेळी घरातील थोरा मोठ्यांचा आदर,त्यांच्या मनातल्या भावना जाणून त्यांच्यासारखीच झाली होती. वेळ प्रसंगी नवऱ्याच्या मताशी ती फारकत घेत होती.पण घरातील मंडळींना ती नाराज करत नव्हती. घरातील इतर मंडळींची मर्जी राखत असताना तिच्या भावनांची राखरांगोळी होत होती.लग्न झाल्यानंतर नवरा खरे तर तिच्या बरोबर असायला हवा होता परंतु दुर्दैवाने असे होत नव्हते  नवरा मुंबईला नोकरी करत होता.नवऱ्याने दोन पैसे कमवावे आणि इंदूने शेतात, घरात काम करावे असे घरातील माणसांना वाटत होते.दोन वर्षात इंदुला एक गोंडस मुलगा झाला होता.मुलाकडे पाहून ती क्षण भर विचार करत असे 

अर्थ दिलास तू नवा माझ्या आयुष्याला जगातले सारे सुख लाभो पोरा तुला.
माहेरी ज्यावेळी या लेकराला ती घेऊन जात असे त्यावेळी पाऊस मी म्हणत असायचा पाठीशी पोराला बांधून दोन तासाचे अंतर ती पार पाडत होती.जीवनातल्या संघर्षाला सामोरे जात असताना ती कधी कधी स्वतःला विसरत चालली होती.ती सासरच्या घरात आल्या पासून धन धान्याची भरभराट होत चालली होती.घरात लक्ष्मीचा वावर आहे असा भास तिच्या घरातील सगळ्या माणसांना होऊ लागला होता.झोपडी वजा घराचे रुपांतर चांगल्या घरात झाले होते.अशी सगळ्यांच्या मनमर्जीला सांभाळत तिने नवऱ्याविणा सात वर्षे काढली होती.

   काही तरी निमित्ताने ती एक महिन्यासाठी मुंबईला आली होती.तिच्या नवऱ्याच्या आत्याच्या घरात दोघं नवरा बायको राहू लागली होती. व तिथेच एक स्वतःचे घर व्हावे अशी मनीची इच्छा तिने नवऱ्याला बोलून दाखवली होती.नवऱ्याने तिला या गोष्टीत साथ दिली होती. व स्वतःचे घर विकत घेतले होते.इथे सुद्धा तिच्या वाट्याला त्रासच आला होता.घराचे कर्ज आणि नवऱ्याचा असलेला कमी पगार यातून संघर्षच वाट्याला येत होता.परंतु हे करत असताना अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण तिला आठवत होती.  झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की, आयुष्यात बऱ्याच गोष्टी पेलण्याची आणि  तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते 

       पाच वर्षानंतर तिने अजून एका मुलाला जन्म दिला होता. ज्यावेळी तिची दोन्ही मुले महानगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागली त्यावेळी मुलांच्या अंगात असलेली स्वच्छ कपडे पाहून शेजारची माणसं त्याचे कौतुक करत होते. गावाकडील सगळी जबाबदारी तिच्या होणाऱ्या जावे वर येऊन पोहचली होती.आता दोन मुले घरात झाली होती.जुन्या घराचे कर्ज फिटले होते. आता वेध लागले होते एका चांगल्या घराचे, ते स्वप्नच होते,परंतु दोघा नवरा बायकोच्या प्रयत्नाला यश मिळाले होते.मुलांचे शिक्षण,नवीन घराचे कर्ज,अशा सर्व संकटातून ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती.स्वतःच्या इच्छा हे दोघेही नवरा बायको मारत होते.संकटे येतात ती परीक्षा पहाण्यासाठी त्यावेळी तिला वाटायचे,

त्रास असतानाही प्रामाणिक राहणे,
संपत्ती असून देखील साधं राहणे,राग असूनदेखील शांत राहणे,
अधिकार असूनदेखील नम्र राहणे यालाच आयुष्याचे मॅनेजमेंट म्हणता येईल .
काही वर्षानंतर मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले होते. मुले चांगल्या जॉब ला लागली होती..आता घरात पैसे खेळू लागले होते.शांती आणि समाधान यांचा वावर मुंबईसारख्या शहरात राहताना आता इंदू अनुभवू लागली होती.परंतु येणाऱ्या भावी आयुष्यात नियतीचा खेळ काही तरी वेगळा होईल असा संकेत तिला मिळू लागला होता.

    वयाच्या तिसाव्या वर्षी मोठ्या मुलाने रजिस्टर लग्न केले होते.कॉलेज मधील मुलगी त्याच्या संसारात आली होती.दोघेही जॉब करत असल्यामुळे घरातील कोणत्याही कामात तिला होणाऱ्या सुनेकडून कोणतीच मदत मिळत नव्हती.उलट कामावरून आल्यानंतर सुनेच्या पुढे पुढे करण्यातच तिचे आयुष्य जात चालले होते.घरात ज्या वेळी कामातून निवांत वेळ भेटला की तिच्या डोळ्यापुढे गत आयुष्याचे काही क्षण चित्रपटाप्रमाणे दिसत असायचे.लहान पणापासून तर या वयापर्यंत भोगलेले त्रासाचे क्षण तरंगू लागले होते.नवऱ्याला कोणती गोष्ट कमी पडली की एखाद्या सासुरवाशीण सारखी ती त्याच्या इच्छा पूर्ण करत होती.मात्र तिच्या इच्छा आकांक्षा मनातल्या मनात दाबून ठेवत होती.तीन चार वर्षा च्या अंतराने दुसऱ्याही मुलाचे लग्न प्रेमप्रकरणातून उरकले होते.त्याच दरम्यान मोठ्या मुलाने आपला संसार वेगळा थाटायचा निर्णय घेतला होता.ज्या दिवशी मोठ्या मुलाने आपला निर्णय इंदुला सांगितला त्यावेळी इंदू गर्भगळीत झाली होती.एवढे सुनेच्या पुढे पुढे करून,प्रत्येक गोष्टीत त्यांच्या बरोबर राहून देखील हा निर्णय तिला चटका देऊन गेला होता.त्या रात्री तिला झोपच आली नव्हती.लहानाचे मोठे करताना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते याची कल्पना न केलेली बरीच,जन्मल्या पासून तर लग्न होत  पर्यंत मुलाला आई ईश्वर समान वाटत असते.पण लग्न झाल्यानंतर मात्र त्याची मानसिकता कशी बदलते हे ती उघड्याडोळ्याने पाहत होती.मुलाचा आनंद हा आपला आनंद हा विचार करून तिने मुलाच्या निर्णयाला दुजोरा दिला होता

इतरांना आनंदी पाहून तुम्ही आनंदी होत असाल तर,
हमखास तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात हा सुविचार तिला पटू लागला होता.

     मध्यंतरीच्या काळात तिच्या आई ,वडिलांचे जाणे तिला खूप मोठा धक्का देऊन गेले होते.आईसाठी तर तिने एक महिना कोणाबरोबर न बोलणे,कोणाच्या सुखाच्या कार्यात सहभागी न होणे,एकंदरीत मौन वृत्त धारण केले होते.कारण ती जी होती तिच्या आईचीच प्रतिकृती होती.आज ही आईची आठवण आली तर ती बेचैन होते.कमी वयातच तिच्या आईला हा देहलोक सोडून परलोकी जायला लागले होते.बारा वर्षाच्या अंतराने वडील ही गेले होते.इंदू एकप्रकारची पोरकी झाली होती.

      इंदू आता वयाची 54 वर्षे पूर्ण करून आयुष्याचा पुढील सारीपाट खेळण्यासाठी तयार झाली होती.तिला आता संसारात आलेल्या चढ उतारामुळे मन लागेनासे झाले होते.देव धर्म,पोथ्या पुराणात ती गुरफटून गेली होती.कधी कधी तिला वाटू लागले होते उर्वरित  आयुष्य वृंदावनात व्यथित करावे आणि तिथल्या लोकांची सेवा करावी आता पर्यंत स्वतःचा संसार केला आता देवाच्या सानिध्यात काढावे.संस्कार संपन्न असलेली इंदू उर्वरित आयुष्याचा विचार असाही करत होती की  अहंकार असलेला माणूस इतरांचा *अपमान* करून स्वतःला मोठे समजत असतो,
        *तर*

संस्कार असलेला माणूस स्वतः झुकून इतराना सन्मान देत असतो.

    54 वर्षाच्या आयुष्यात इंदूने सुखाचे आणि दुःखाचे पावसाळे झेलले असताना कधीही स्वतःचा विचार केला नाही ,अशा इंदूच्या जीवनप्रवासाला काय म्हणावे बरे.
fb img 1774661444136

Related posts

यात्रा जत्रात तमाशाच्या आयोजनासाठी गाव पुढाऱ्यांना कला प्रेमींची भावनिक साद !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखानास्थळी संपन्न झाला वन-अग्नीमुक्त दिन!!

Chief Editor

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment