सामाजिक

भावना महत्वाची,भावना जपणे पण तितकंच महत्वाचं !

1009562693
1009562693

पंचनामा विचारधन – नेहमीच असणाऱ्या “ओढी ” पोटी काल यात्रेनंतर खूप दिवसांनी धामणीला जाणे झालं….!
सोबत नेहमीसारखीच सावली सुद्धा होती….!

नेहमीच ठरविल्या प्रमाणे पाहिली, “मिसळ “नंतर खंडोबा, आणि आता उरलेली,”भा. वा. बेरी ” चौकातील नेहमीची “चार घर “न चुकता करतो ती ….!

पहिलं खंडू मामा आणि शालन मामीचं दुसरं नामदेब मामा आणि मामी, तिसरं सुनील कासार (सासवडे ), आणि चौथ आमचं….!

आमच्या घराची चावी ज्या घरी असते ते घर बंद, प्रमोद काका ला कुठं तरी वास्तू होती म्हणून, बाहेरूनच दरवाजा आणि भिंती पाहिल्या आणि नामदेव मामाच्या घराकडे निघालो….!

नामदेव मामा च्या घरात गेल्या गेल्या आमच्या ऐशी वर्षाच्या. मामीची नेहमीप्रमाणे लगबग सुरु झाली, मामीला शांत बसायला संगितलं पण ऐकेल ती मामी कसली?….!

ताकाने कठोकाठ भरलेले चार ग्लास तीने पुढ्यात आणून ठेवलेच, आणि जेवायला काय करू? हा नेहमीचा सवाल ओघानेच आला…..!

सकाळी फकिराकडं खाल्लेली प्लेटभर “मिसळ,” एक प्लेट ” भजी ” आणि चार वेळा ओतून घेतलेला “लालसर रस्सा” सोबत दोन “पाव”खाऊनच , पोट भरून गेलं होतं….!

नामदेव मामाला नेहमीचा पायंडा माहिती असल्यामुळे त्यानेच मामी ची समजूत काढली….!

समोरच सुनील चं घर पण सुनील अहमदाबाद ला गेला होता त्यामुळं घर बंद होतं….!,
बाहेर ओट्यावर बसूनच प्रज्ञेश बरोबर गप्पा सुरु केल्या…!

बऱ्याच सुख दुःख च्या कहाण्या ऐकण्यात आल्या संगीता पुन्हा एकदा पडल्याच समजलं ती सुद्धा खूपच धीराची, अनेकदा पडते, पण पुन्हा एकदा,”धडपडून पुन्हा उभी राहते….!
तिला ऐकून शाळेत गाढवे सरांनी शिकवलेली हिन्दीतील एक कविता आवर्जून आठवली गेली….!

“नन्हीं चिंटी जब दाना लेकरं चलती है,
चढकर गिरना, गिरकर चढना
नहीं बिसरती है “…!

नेहमीच धडपडीतुन उभं कसं राहायचं? याचा धडाच या सासवडे कुटुंबियांकडून आम्हा सर्व धामणीकरांना मिळालेला आहे…..!

अर्धतास नेहमीचेच गप्पा विशेष संपवून, खंडू मामाच्या घराकडे मोर्चा वळवीला….!

“शालन मामी ” नुकतीच पारायण क रून आलेली होती.पण ती तरी कधी दम काढणार? तीने गॅस कडे आपला मोर्चा वळविण्यापूर्वीच तिला पण, “मिसळ पुराण “सांगावं लागलं….!

अर्धा पाऊण तास नात्यागोत्याच्या गप्पा झाल्यावर दुपारी बारा वाजता येणाऱ्या एस टी ची आठवण झाली….!

निघताना शालन मामी ने बजावलेच, “पुढच्या वेळेस येताल तेव्हा जेवून जायचंय बरका जावई….!

“नक्कीच मामी जेवायलाच येणार पुढच्या वेळी, पण जेवायला काय करणार तेव्हा….?

यावर कोणतंही उत्तर न देता मामी स्वयंपाक घरात गेली, एका प्लास्टिक च्य पिशवीत. भरून कसलं तरी पीठ घेऊन आली,….!

ती पिशवी सौं हेमाच्या हातात देऊन म्हणाली,
जावई बापूंना, “हुलग्याची शेंगुळी “खूप आवडते , हे मला माहिती आहे, परवाच केली होती शेंगुळी, थोडं पीठ उरलंय, घरी जाऊन करुन घाल त्यांना.”…..!

असं सांगून माझ्या साठी एकच कप चहा ठेवायला मामीने गॅस पेटवलाच, आणि पपई कापायला घेतली…..!

मीच म्हणालो नको मामी आता काहीच, तर मामींनी अजून एक प्लास्टिक पिशवी शोधून ती पपई पिशवीत भरून हेमाकडं दिली…..!

न कळत डोळ्याच्या पापण्या ओलावल्या गेल्या, आपली आवड माहिती असणारे आणि ती आपली आवड जपणारे आता कितीसे उरलेत……!

किती बारीक सारीक तपशील असतो हो यांचेकडं,जेष्ठ अधिक महिन्यात जावयाला मिळणारा ” आधीक वान ” जर जावयाला आवडणाऱ्या अशा वस्तुतुन मिळतं असेल तर तों जावई नक्कीच नशीबवान ठरेल….!
मी सुद्धा त्या नशीबवान जावई पैकीच एक जण झालो….!

म्हणून म्हणतोय, “भावना महत्वाची,”खरंतर या भावनेचा आदर ठेऊन त्या भावना जपणे सुद्धा तितकंच महत्वाचं असताना,

” पुढच्या वेळेस नक्कीच जेवायला येईल मामी “…..!

असं आश्वासन देऊन मनात चाललेल्या असंख्य भावनाशी आणि काहींश्या,”जड अंतःकरण ने मामा मामीचा निरोप घेऊन एस टी स्टॅन्ड कडे निघालो.

“पुढच्या वेळेस मामीच्या हाताने केलेल्या शेंगुळी खाण्याच्या इच्छे ला बळकटी देऊन……!

✍️ मोहन वामने
8087459030

fb img 1774661449199

Related posts

डॉ. अलेक्झांडर गिबसन समाधी – भारतीय वनसंवर्धनाचा प्रेरणादायी वारसा !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथे रेशनिंग वाटप स्लिपचे वाटप!!

Chief Editor

धामणीच्या खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवणारा किमयागार किशोर बापू विधाटे !!

Chief Editor

Leave a Comment