सामाजिक

हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादूगर ज्यानी माणसे जोडली जातात…!”

1009498163
1009527837

आयुष्याच्या पुस्तकात वेळ आणि काळ यांना जितकं महत्व आहे तितकंच महत्व शब्दांना आहे..कारण वेळ घाव देऊन जाते पण शब्द मनाच्या खोल कप्प्यात घर करुन राहतात..कधी एक साधा सकारात्मक शब्द आपल्या आत्मविश्वासाला गरूडाचे पंख देऊन जातो तर कधी एक चुकीचा शब्द आपल्या मनाला विषारी डंख मारून जातो.. एखाद्या वेळेस माणूस विसरला जातो पण शब्द मनात कायम घर करुन राहतात…!!

शब्द शोधला तर अर्थ आहे. वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सांत्वन आहे. झेलला तर आज्ञा आहे. टाकला तर वजनदार आहे..शब्द अक्षय पण आहे. आणि निशब्द पण आहे..! “हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली जातात…!

खरंच आपल्या जीवनाचा चित्रकार आपणच बनावं.. कधी थोडं लहान तर कधी मोठं होऊन जगावं..स्वतःला जो आवडेल तोच रंग या जिवनात भरावं…!

शब्द– अडीच अक्षरांपासून तयार झालेला हा शब्द.. अक्षरांपासून शब्द तयार होतो आणि शब्दांपासून वाक्य. बोलताना जपावे ते शब्द ओठातले.. शब्द हे जपून वापरावेत. कारण शब्दामुळे होणारी जखम ही शरीराला नाही तर मनाला होते.. शब्दांना तलवारी पेक्षा ही जास्त धार असते.. फरक फक्त एवढाच की तलवारीने “मान” तर शब्दांनी “मन” कापले जाते..जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू येत असले तरी दोघांपासून होणारी वेदना ही सारखीच असते.. म्हणूनच म्हटलंय की शब्द जरा जपून वापरा शब्दांना तलवारीपेक्षा ही जास्त धार असते..!!
शब्दच माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात. हे शब्दच आहेत जे कधी “रामायण” घडवतात तर कधी “महाभारत” रचतात. कुणाच्या एका शब्दावर माझे हसणे अवलंबून आहे तर कुणाच्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून आहे..! हत्यारांनी होणाऱ्या जखमा मलमपट्टी करून बुजवता येतात परंतू शब्दांच्या हत्यारांनी झालेली जखम बुजवण्यासाठी कोणतेही मलम अस्तित्वात नाही..!

माणसं कृती विसरून जातात पण हवेत विरणारे शब्द धरून ठेवतात.. खरंतर शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं त्याच्यासारखा उत्तम स्वयंपाकी या जगात कोणीच नाही. शब्दांची सुद्धा एक चव असते.. बोलण्या अगोदर स्वतः ती चाखून बघायला हवी..जर स्वतःला ती चांगली वाटली नाही तर “दुसर्‍यांना ती कशी चांगली वाटेल” याचा विचार करायला हवा..!! रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा कांही शब्द आहेत.. चांदण्याच्या शितलपणात पण काही काव्य नक्कीच आहे.. त्याचा अनुभव मात्र घ्यायला हवा.. “प्रार्थना ही आपली नेहमीची सवय व्हायला हवी ना की अडचणीच्या वेळेचा एक सहारा”..!!

शब्दांमुळेच खुशी, शब्दांमुळेच दुःख..शब्द हेच पिडा, शब्द हेच मलम..शब्द हेच हास्य, शब्द हेच व्यंग..शब्द हेच लय..शब्द हेच तरंग..शब्द असमंजस, शब्द हीच युक्ती..शब्द हेच बंधन अन् शब्द हीच मुक्ती..शब्द हेच सुविचार अन् शब्दच हेच संस्कार.. शब्द हेच ब्रम्ह, शब्द निर्विकार..शब्दामुळेच क्रांती, शब्दामुळेच शांती..शब्दामुळेच युद्ध, शब्दामुळेच संधी..शब्द हेच आरंभ अन् शब्द हेच अंत. शब्द हेच गौण, शब्द अनंत..
न असता शब्द तर न असती भाषा..!

शब्दच शिकवतात पडता पडता सावरायला, अन् शब्दच शिकवतात रडता रडता हसायला..! शब्दामुळेच होतो एखाद्याचा घात, अन् शब्दामुळेच मिळते आयुष्यभर एखाद्याची साथ..!
शब्दामुळेच जुळतात मनामना च्या तारा, अन् शब्दामुळेच चढतो एखाद्याचा पारा..!
शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी, अन् शब्दामुळेच तरळते कधी डोळ्यात पाणी..!

म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. एकवेळ पाय घसरला तर सांभाळून पुन्हा उभे राहता येते पण जीभ घसरली तर बोललेले शब्द परत घेता येत नाहीत… मनावर नेहमीसाठी चरे पडतात..

संत तुकाराम महाराजांनी शब्दावर खूप मार्मिक भाष्य केलं आहे..ते सहज लिहीतात…

घासावा शब्द ! तासावा शब्द !
तोलावा शब्द ! बोलण्यापुर्वी !
बोलावे बरे ! बोलावे खरे !
कोणाच्याही मनावर ! पाडू नये चरे ! थोडक्यात समजणे ! थोडक्यात समजावणे..!शब्दांमुळेच दंगल! शब्दांमुळेच मंगल ! शब्दांचे हे जंगल! जागृतं रहावं ! जिभेवर ताबा! सर्वसुखदाता! पाणी, वाणी, नाणी नासू नये..!!

अशी ही शब्दांची महती. जोडत जाते नवीन नवीन नाती.. म्हणूनच बोलताना शब्द जरा जपून आणि तोलून मापून वापरावेत…आणि त्या शब्दांना आपले मित्र बनवुया म्हणजेच ते आपले चित्र व चरित्र सुंदर बनवतील…!!

श्री निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर
छ. संभाजीनगर

मो.नं. – 9881084320

fb img 1774661449199

Related posts

असे तमाशाफड ; असे तमाशा व्यवस्थापक – मा.बाळासाहेब विरळीकर

Chief Editor

पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील ट्रांसफार्मर गेला चोरीला !!

Chief Editor

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

Chief Editor

Leave a Comment