
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांची दुष्काळी परिस्थितीबाबत फेरतपासणी करून दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबतचे पत्र आंबेगाव तालुका भाजपा पूर्व मंडलाचे अध्यक्ष किरण वाळुंज यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी भागांच्या यादीमध्ये आंबेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विशेषतः आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व चिंतेचे वाततवरम निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभें धरण परिसर तसेच नदीकाठच्या काही गावांमध्ये पाण्याची उपलब्धता असल्यामुळे त्या परिसरात तुलनेने हिरवळ दिसून येते. मात्र, यावरून संपूर्ण तालुक्यातील परिस्थितीचे आकलन करणे योग्य ठरणार नाही.
शिरूर तालुक्याला लागून असलेल्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्टयातील अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण व दीर्घकाळ राहिलेली पावसाची टंचाई यामुळे या भागातील खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर वाया गेला असून, रब्बी हंगामातील पिकांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता, जनावरांच्या चान्याचा प्रश्न आणि शेतकन्यांचे झालेले पीक नुकसान यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या एकूण परिस्थितीचा विचार करण्याऐवजी पूर्व भागातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावांची स्वतंत्रपणे प्रत्यक्ष फेरतपासणी व पुनर्मूल्यांकन करण्यात यावे अशी मागणी भाजपा पूर्व आंबेगाव मंडलाचे अध्यक्ष किरण वाळुंज यांनी पत्रा द्वारे केली आहे.
