सामाजिक

रणरागिणी आशाताई : सत्तेबाहेर राहूनही सत्ताकेंद्र ठरलेली दुर्मिळ लोकनेत्री

1011020061

शब्दांकन – विठ्ठल जाधव पत्रकार पुणे


‘रणरागिणी’, ‘वाघीण’… हे शब्द आशाताईंना खरंच लागू होत होते का? हा प्रश्न मला अनेकदा पडायचा. कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला केवळ या विशेषणांत बांधणेच कदाचित अपुरे ठरेल. त्यांचे काम, विषयाचा अभ्यास, प्रशासनाला जाब विचारण्याची पद्धत आणि सामान्य माणसासाठी लढण्याची जिद्द ही अनेकदा पुरुष राजकारण्यांपेक्षाही दोन पावले पुढे असायची.राजकारणात सत्ता मिळविण्यासाठी धडपडणारे, सत्तेला चिकटून राहणारे आणि सत्तेच्या माध्यमातून पदे-लाभ मिळविणारे अनेक जण दिसतात. पण सत्तेत नसतानाही सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रभावीपणे लोकांची कामे करून दाखविणे, ही गोष्ट दुर्मीळ असते. आशाताई बुचके यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व याच दुर्मीळ श्रेणीत मोडणारे लोकनेत्री नेतृत्व म्हणावे लागेल.

पुणे जिल्हा परिषदेत त्यांचा जवळपास दोन दशकांचा प्रवास प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या बाकावरून झाला. सभापती, अध्यक्ष किंवा सत्ताधारी सदस्यांकडे असलेली प्रशासकीय ताकद त्यांच्या हातात नव्हती. तरीही त्यांचे काम अनेकदा सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरले. ‘सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही’ हा राजकारणातील रूढ समज त्यांनी आपल्या कृतीतून मोडून काढला.महिला आणि सत्ता या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन आशाताईं बुचके यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. पुणे जिल्ह्याच्या समाजमनावर, राजकारणावर आणि प्रशासकीय पटलावर त्यांनी उमटवलेला ठसा आजही तितकाच ठळक आहे.

पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी अर्थात वैष्णवधाम या गावातून आशाताई पुण्यात यायच्या. नारायणगाव सोडले की अधिकाऱ्यांना त्यांचा फोन जायचा—‘मी पुण्याकडे निघाले आहे. आपण कार्यालयात किती वाजता आहात? मला भेटायचे आहे. माझी काही कामे आहेत.विशेष म्हणजे केवळ फोन करून त्या थांबत नसत. संबंधित कामांची पत्रे तयार असायची. कोणत्या अधिकाऱ्याला काय सांगायचे, कोणत्या विषयावर चर्चा करायची, याची त्यांची पूर्वतयारी असायची.
मला देखील त्यांचा फोन यायचा—‘विठ्ठलभाऊ, मी नारायणगाव सोडले. डबा आणलाय. दुपारी दोन वाजता अमुक अधिकाऱ्याच्या दालनात भेटू. दोन-तीन विषयांवर चर्चा करायची आहे. असं.. असं… झाले आहे. काय करायचं ! पुढे या या ठिकाणी लोक थांबले आहेत.
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, पणन संचालनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, साखर आयुक्तालय, सहकार आयुक्तालय आणि सेंटर बिल्डिंग परिसरात आशाताईंची वाट पाहत उभे असलेले सर्वसामान्यांचे जथ्थे मी वर्षानुवर्षे पाहिले आहेत.त्या लोकांच्या डोळ्यांत एक वेगळाच विश्वास असायचा—‘आपले काम आशाताई करतील.’आणि आशाताईंकडून काम व्हायचेही.

विरोधी पक्षात असूनही सत्ताधाऱ्यांपेक्षा दोन पावले पुढे जाऊन काम करून दाखवण्याची ताकद त्यांच्यात होती. ही ताकद त्यांनी भाषणातून नव्हे, तर कृतीतून सिद्ध केली. जिल्हा परिषद सभागृह असो, जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा विभागीय आयुक्तांचे दालन असो, मंत्रालयातील सचिवांचे कार्यालय असो किंवा मंत्र्यांचा कक्ष—विषयाला भिडण्याची आणि तो मार्गी लावण्याची ताकद आशाताईंनी स्वतःमध्ये निर्माण केली होती. अधिकारी कितीही वरिष्ठ असो, विषय योग्य असेल तर त्या आपली भूमिका ठामपणे मांडत. त्यांचा रोखठोक स्वभाव प्रशासनाला परिचित होता. सरकारी कर्मचाऱ्यांना त्या कधी रागावून बोलल्या तरी त्यामागे वैयक्तिक आकस नसायचा. कारण त्यांचा आग्रह हा स्वतःसाठी नसून सामान्य माणसाच्या कामासाठी असायचा.यातूनच प्रशासनावर त्यांचा नैतिक दरारा निर्माण झाला होता.

त्यांच्या कार्यपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास. केवळ आरोप करून किंवा घोषणाबाजी करून त्या थांबत नसत. नियम काय आहे, शासन निर्णय काय सांगतो, प्रशासनाची जबाबदारी काय आहे, कायदेशीर तरतूद काय आहे—याचा अभ्यास करून त्या विषय मांडत.त्यामुळे त्यांच्या आक्रमकतेला अभ्यासाची आणि त्यांच्या आवाजाला तथ्यांची साथ असायची.
आशाताईंचा आणि माझा परिचय साधारण २००२ सालचा. जिल्हा परिषदेत सावरगाव-येणेरे गटातून शिवसेनेकडून त्या सदस्य म्हणून निवडून आल्या. मी ‘सामना’चा बातमीदार असल्यामुळे पुण्यातील पत्रकारांमध्ये सुरुवातीला माझी त्यांच्याशी ओळख झाली. पुढे हळूहळू प्रकाश भोईटे, श्रीकृष्ण कुलकर्णी, शाम दौंडकर, रमेश डोईफोडे, योगेश कुटे, अविनाश थोरात, भजनदास देवकर, गजेंद्र बडे, सुषमा नेहरकर, निशा नंबियार, मुस्तफा, दिगंबर दराडे, अमोल कुटे, सागर येवले, गणेश आंग्रे, निलेश राऊत, गणेश वाघमोडे, व्यंकटेश भोळा, नवनाथ शिंदे, दुर्गेश मोरे, नरेंद्र साठे, निनाद देशमुख, अनिल भोसले आणि ऋषी जगताप यांच्यासह पुण्यातील अनेक पत्रकार, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि ऑनलाइन माध्यमांचे बातमीदार यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. हा केवळ पत्रकारांशी असलेला परिचय नव्हता. तो एक ऋणानुबंधांचा परिवार होता. अखेरपर्यंत त्यांनी हे स्नेहबंध जपले.आज त्यांच्या आठवणींची शिदोरी या प्रत्येकाच्या मनात आहे. असं त्यांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द वीस वर्षांची. या काळात सतीश खोमणे, देवराम लांडे, सविता दगडे, वैशाली आबने, दत्तामामा भरणे, प्रदीपदादा कंद, विश्वास नाना देवकाते आणि निर्मलाताई पानसरे या आठ अध्यक्षांसमोर आशाताईंचा कामाचा आलेख, आठवणींचा गहिवर दाटलेला असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील वीस वर्षातील खाते प्रमुख त्यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार आहेत.

‘मुंबईवाली बाई’ ते ‘जुन्नरची कडकलक्ष्मी’
आशाताईंच्या आधी सावरगाव-येणेरे गटाचे प्रतिनिधित्व रामदास चव्हाण आणि त्यांच्यापूर्वी माजी आमदार शिवाजीराव काळे यांनी केले होते. मुंबईत काही काळ राजकारण करून पुणे जिल्हा परिषदेत आलेल्या आशाताईंविषयी सुरुवातीला ‘मुंबईवाली बाई’ अशी चर्चा व्हायची. मात्र ग्रामीण भागातील प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून ते सभागृहात सचोटीने मांडण्याची त्यांची पद्धत पाहता त्यांचे ‘मुंबईपण’ कधी विरघळून गेले, हे कळलेही नाही.वर्षभरातच त्यांची ओळख झाली—‘जुन्नरची कडकलक्ष्मी’ म्हणून.त्यांची आक्रमकता बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतही होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ‘रणरागिणी’ ही उपाधी दिली होती. ती उपाधी त्यांच्या कार्याला साजेशीच होती.

सभागृहात एकटी, पण विषयासाठी कधीच एकटी नाही
२००२ ते २००७ या पहिल्या पंचवार्षिक काळात जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्षाचे वातावरण होते. नामदेव तांबे, सोमनाथआबा लांडगे, विश्वासनाना देवकाते, अमोल भिसे यांसारख्या विरोधी पक्षाच्या दिग्गज सदस्यांसह आशाताई आपली भूमिका मांडायच्या. विशेषतः जुन्नरमधील सत्ताधारी सदस्य आशाताईंना सभागृहात रोखण्यासाठी आक्रमकपणे भूमिका घ्यायचे. सर्वसाधारण सभेपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या होणाऱ्या बैठकीत नेत्यांकडूनच आशाताईंना रोखण्यासाठीचे आदेश दिले जायचे.पण आशाताईंना रोखणे सोपे नव्हते.एखादा विषय त्यांनी हातात घेतला की तो मार्गी लागेपर्यंत त्या त्याचा पाठपुरावा करायच्या. विरोध झाला तरी मागे हटायच्या नाहीत. नंतर नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोध करणे देखील सोडून दिले. अनेकदा आशाताई तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील नंतर अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन थेट कामे मंजूर करून घ्यायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्य आणि आमदारांनी याबद्दल थेट दस्तुरखुद अजित पवारांकडे तक्रार केली. तेव्हा अजितदादा त्यांना म्हणाले, त्या लोकहिताची चांगली कामे घेऊन येतात. कामे योग्य होती म्हणून मी त्यांना शिफारस केली. तुम्ही देखील त्यांच्या सरखी चांगली कामे घेऊन या.. अनेक प्रश्नांबद्दल अजितदादा देखील आशाताईंना बोलवून घ्यायचे. समन्वयाच्या बैठका देखील व्हायच्या. पालकमंत्री गिरीश बापट हे देखील आशाताईंचा लढाऊ बाणा आणि कामांचे कौतुक करत. शिवसेना आणि नंतर भाजप या दोन पक्षभोवतीच त्यांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले असले तरी पक्षाच्या मर्यादा त्यांनी तंतोतंत पाळल्या.

त्यांचे कार्यक्षेत्र केवळ सावरगाव-येणेरे गट किंवा जुन्नर तालुका या मर्यादेच्या पुढे गेले. बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, पुरंदर, हवेली अशा जिल्ह्यातील विविध भागांतील प्रश्न त्या सभागृहात मांडत.आशाताईंची सभागृहातील लढाई ही ‘विरोधासाठी विरोध’ कधीच नव्हती. नियम, कायदा आणि सार्वजनिक हित यांच्या आधारावर प्रश्न उपस्थित करणे ही त्यांच्या राजकारणाची पद्धत होती.

एकदा एक मोठा कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला.जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिकारातील विषय समित्यांच्या खातेवाटपाचा प्रश्न त्यांनी नियमांच्या आधारे उपस्थित केला. सभापतींचे खातेवाटप हा जिल्हा परिषद सभेचा वैधानिक विषय. बहुमताने त्यावर निर्णय होतो. मात्र सत्ताधारी, अध्यक्ष आणि प्रशासनाने अध्यक्षांच्या आदेशाने खाते वाटप केले. या प्रकरणात आशाताईंनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले. आयुक्तांपुढे आशाताई यांची बाजू मी मांडली. आर्गुमेंट केले.पुढे या विषयाची शासन पातळीवर चर्चा झाली आणि विषय समित्यांच्या खातेवाटपाबाबत सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून निर्णय घेण्याची कार्यपद्धती स्पष्ट करणारा शासन निर्णय जारी करणारा जीआर निघाला. हा प्रसंग महत्त्वाचा यासाठी की आशाताई सारख्या एका लोकप्रतिनिधीने उपस्थित केलेला नियमाधारित प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता न राहता प्रशासकीय कार्यपद्धतीत बदल घडवून आणणाऱ्या चर्चेपर्यंत पोहोचला.

त्यानंतरचा दुसरा प्रसंग म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक होती. जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते.या निवडणुकीसाठी सूचना पत्रावर बैठकीचे स्थळ पुणे जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृह असे देण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी करणे आणि निवडणूक घेणे ही सर्व सर्व निवडणूक प्रक्रिया या सभागृहात अपेक्षित होती. मात्र ऐनवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू केली. ही गोष्ट अशा त्यांच्या लक्षात आली. प्रशासनाला त्यांनी अजिबात कळू न देता कायदेशीर पत्र व्यवहार तयार ठेवला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही मिनिट बाकी असताना पत्रकार आणि चॅनलसह आशाताई उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तळमजल्यावर असलेल्या शरदचंद्र सभागृहापुढे गेल्या. तर सभागृहाचे दार बंद होते. मला अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरता येत नाही. सभागृह बंद आहे असे नमूद करून त्यांनी कायदेशीर मुद्दा उपस्थित केला.त्याच क्षणी त्यांनी एक ईमेल जिल्हाधिकाऱ्यांना केला. फोनवर माहिती दिली. माणूस पाठवून निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्र देखील दिले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली होती. जिल्हा परिषदेमधील अधिकारी कर्मचारी धावत पळत सहाव्या मजल्यावरून खाली आले. घाई घाई कागदावर मजकूर लिहून निवडणूक प्रक्रिया सहाव्या मजल्यावर होणार आहे. असे पत्र सभागृहाच्या दरवाजावर चिटकवू लागले. हे सर्व धावपळ सुरू असताना त्यांनी त्याचे देखील वेळेसह शूटिंग केले. या सगळ्या गडबडीतही जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली. त्यामध्ये आशाताईंनी हरकत नोंदवली. प्रशासनाकडून ठिकाण बदलण्यात आल्याचे पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट केली. या विरोधात देखील आशाताईंनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. सुनावणी सुरू झाली. त्यांचा दावा थेट निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होता. तर निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय जबाबदारी जिल्हा परिषदेची होती. त्यामुळे या दोन्ही यंत्रणा उघड्यावर पडल्या. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रतिनियुक्तीवर दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयात गेले. परंतु निवडणुकीशी संबंधित विषय हा प्रत्यक्ष तत्कालीन जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत असल्याने सुनावणी आणि निर्णय लांबणीवर पडत गेला. आशाताईंकडून पाठपुरावा सुरू होता. अनेक नेते पदाधिकारी त्यांना या विषयात विनंती करत होते. अखेर ताईंनी त्यावेळीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित ठेवा अशी भूमिका घेतली. अखेर ते दिल्लीवरून आले. आणि हा विषय यांच्या मध्यस्थीने मिटला.अशा अनेक प्रसंगांत आशाताईंनी प्रशासनाला प्रश्न विचारले आणि उत्तर मिळेपर्यंत पाठपुरावा केला.
जेजुरी आणि शिरूरमधील बीओटी प्रकरण, उरुळी कांचन येथील जिल्हा परिषदेच्या खर्चाशी संबंधित जमीनविषयक प्रश्न, नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटनाचा वाद, जिल्ह्यातील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर केलेले मडके फोड आंदोलन—असे अनेक प्रसंग त्यांच्या राजकीय प्रवासात आले.

सत्ताधाऱ्यांनाही विचारावे लागायचे—‘आशाताईंचे मत काय?’
गेल्या दोन दशकांत पुणे जिल्ह्यात अनेक राजकीय समीकरणे बदलली. अनेक आमदार आले, जिल्हा परिषद सदस्य बदलले, अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सभापती बदलले. मात्र आशाताईंचा प्रभाव कायम राहिला. त्यांच्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील, त्यानंतर अजित पवार आणि गिरीश बापट यांच्याकडे त्यांची पत्रे गेली की त्यावर गांभीर्याने शेरा होऊनच पुढील कार्यवाही होत असल्याचे मी पाहिले आहे.

अनेकदा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही काही निर्णय घेण्यापूर्वी ‘आशाताईंचे मत काय?’ हे जाणून घेणे महत्त्वाचे वाटायचे. अनेक अधिकारी आणि खातेप्रमुख फाईल घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला येत. विरोधी पक्षात असूनही त्या एक प्रकारे जिल्हा परिषदेतील अनौपचारिक सत्ताकेंद्र बनल्या होत्या.

पराभव झाला, पण आशाताई कधी हरल्या नाहीत
आशाताईंनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडणूक लढवली. त्या आमदार होऊ शकल्या नाहीत. पण निवडणुकीतील पराभवाने त्या कधी खचल्या नाहीत.कारण त्यांचे राजकारण पदाभोवती नव्हते; ते समाजाभोवती होते.

एकदा विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या शिक्षणावरून दुसरी तिसरी असल्याची प्रतिस्पर्धी उमेदवाराने टीका केली. त्या मला फोन करून म्हणाल्या, ‘विठ्ठलभाऊ, माझ्या शिक्षणाचा मुद्दा त्यांनी घेतला आहे. किती खालच्या पातळीवर गेले!’ मी त्यांना सांगितले—‘ताई राजकीय उत्तर देऊ नका. तुमच्या पद्धतीने उत्तर द्या.’ मुंबईत वावरल्यामुळे त्यांना हिंदी उत्तम येत होती. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्या सहज इंग्रजीही वापरत असल्याचे मी बघितले होते. मी त्यांना सुचवले की उद्याच्या सभेत हिंदी आणि इंग्रजीतून भाषण करा.दुसऱ्या दिवशी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा साधा उल्लेखही न करता थेट हिंदी आणि इंग्रजीतून भाषण केले.सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विरोधकांची टीका थांबली. परंतु त्याच बरोबर त्यांना देखील जनतेच्या टीकेला सामोरे जाऊन स्वतःची फजिती करून घ्यावी लागली.

माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी

आशाताईंचा स्वभाव उमदा होता. राहणीमान रुबाबदार, आवाज खणखणीत आणि बोलणे स्पष्ट.सभागृहात एखाद्या विषयावर तीव्र मतभेद झाले तरी सभा संपल्यानंतर त्या संबंधितांच्या दालनात जाऊन गप्पा मारायच्या. पत्रकारांबरोबर गप्पांचा फड रंगायचा. राजकारणात सर्वांशी पटणे शक्य नसते. आशाताईंचेही सर्वांशी जमले नाही. पण मतभेद म्हणजे वैर, असा अर्थ त्यांनी कधी घेतला नाही.ज्याच्याशी राजकीय मतभेद आहेत, त्याचे चांगले काम असेल तर त्याची दखल घेण्याची त्यांची तयारी असायची. मानापमानाचा विचार न करता योग्य व्यक्तीकडे जाण्याची त्यांची तयारी होती. विधानसभा निवडणुकीत चार वेळा पराभव झाला. त्या आमदार होऊ शकल्या नाहीत परंतु आमदारापेक्षाही मोठ्या झाल्या. मुंबईतील मंत्रालय, विधानभवन असो की दिल्लीतील साउथ आणि नॉर्थ ब्लॉक, कृषी भवन, रेल भवन तेथेही आशाताईंचा मुक्त संचार होता. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी पदांपेक्षा माणसे अधिक कमावली. गेल्या पंचवीस वर्षांत पुणे जिल्ह्यात निवडून आलेल्या अनेक आमदारांना, जिल्हा परिषद सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आशाताईंची मदत झाली.

आता तो फोन कधीच येणार नाही…
या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली—आशाताईंचा फोन.
‘विठ्ठलभाऊ, असं झालंय. काय करायचं?’

एखादा प्रश्न असो, एखादी प्रशासकीय अडचण असो, एखादा राजकीय पेच असो किंवा एखाद्या सामान्य माणसाचे काम आशाताईंचा मला फोन ठरलेला. आजही त्या फोनची वाट पाहण्याची सवय आहे.पण आता तो फोन कधीच येणार नाही. ‘विठ्ठलभाऊ, मी निघाले नारायणगाव सोडले… डबा आणलाय… अमुक अधिकाऱ्याला भेटायचे आहे….विठ्ठलभाऊ, असं झालंय. काय करायचं?’ लोक थांबले आहेत…’

अशाताईंचे हे शब्द आता आठवणीतच राहतील. जिल्ह्यातील असंख्य सामान्य कार्यकर्त्यांसाठी आशाताई नेत्या होत्यास परंतु त्याच बरोबर त्या एक आधार होत्या. सत्तेच्या राजकारणात सत्तेबाहेर राहूनही प्रभाव निर्माण करता येतो, पद नसतानाही प्रशासनाला जाब विचारता येतो, पराभव होऊनही लोकांच्या मनात जिंकून राहता येते आणि राजकारण करताना माणुसकीची नाळ जपता येते—हे आशाताईंनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. म्हणूनच ‘रणरागिणी’ हा शब्द त्यांच्या आक्रमकतेसाठी असेल; ‘वाघीण’ हा शब्द त्यांच्या धाडसासाठी असेल; ‘कडकलक्ष्मी’ हा शब्द त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी असेल.पण आशाताईंची खरी ओळख यापेक्षा मोठी आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात अनेक अध्यक्ष, सभापती, पदाधिकारी आणि सदस्यांची नावे येतील. सत्तेची अनेक समीकरणे बदलतील. पण सत्तेबाहेर राहूनही लोकांच्या मनात आणि प्रशासनाच्या दालनात आपला ठसा उमटवणाऱ्या आशाताईंच्या कार्याची नोंद या इतिहासाला घ्यावीच लागेल.कारण काही माणसे पदावर असतात म्हणून मोठी होत नाहीत…ती माणसांच्या आयुष्यात उभी राहतात म्हणून आशाताईंसारखी मोठी होतात.

विनम्र अभिवादन
विठ्ठल जाधव. पत्रकार पुणे

Related posts

११ सप्टेंबर “राष्ट्रीय वन हुतात्मा दिन” – साभार लेख – गायत्री नचिकेत अवधानी

Chief Editor

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

फुलांचे भाव घसरले; बळीराजा सापडला आर्थिक संकटात !!

Chief Editor

Leave a Comment