
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्समध्ये स्मृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सामाजिक, कृषी व संविधानविषयक कार्याची माहिती व्हावी आणि त्यांच्या विचारांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ. उत्तमराव शेलार होते. प्रमुख उपस्थितांमध्ये महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूडचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. चत्रभूज कदम तसेच डॉ. राजेश मिरगे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ.दिलीप हांडे यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार व कार्य महाराष्ट्रातील तरुण पिढीला माहिती व्हावेत. यामधून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन उद्याचे आदर्श नागरिक घडावेत या हेतूने श्री शिवाजी शिक्षण संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम हाती घेतलेला आहे, असे म्हटले.
‘लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक, कृषी व संविधानविषयक कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. चत्रभूज कदम म्हणाले की, “डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, कृषी, समाजसुधारणा आणि शेतकरी हिताच्या क्षेत्रात दूरदृष्टीने कार्य केले. ग्रामीण व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या माध्यमातून त्यांनी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव ठेवून कृषी विकास व शेतकरी संघटनांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. त्यांचे विचार व कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सामाजिक समता, कृषी विकास आणि संविधानिक मूल्ये यांचा समन्वय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांतून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घ्यावी.”
अध्यक्षीय मनोगतात डॉ. उत्तमराव शेलार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. महापुरुषांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. देशमुख यांनी केले असून, त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, रा.से.योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा. अक्षय वाघ, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उद्धव भारती यांनी केले, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. गणेश बोरचटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



