
पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी खंडोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर रविवारी शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सरता चैञ महिना व उगवत्या वैशाख महिण्यातील वसंत व ग्रीष्म ॠतुतील तिसरी वासंतिक चंदनउटी साकारण्यात आली.

खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या चंदनउटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर पहाटे पाच वाजता आदिनाथ जाधव व मंगल जाधव (धनकवडी) तुषार जाधव व श्रध्दा जाधव (मुंबई) शिवाजी सरडे व सुनिता सरडे (हडपसर) सोमनाथ सोनवणे व स्वाती सोनवणे (वाफगांव) भूपेंद्र तांबे व कृष्णल तांबे (शिरदाळे) राहूल भगत व गायञी भगत,दिलीप पंचरास व आशा पंचरास,नारायण गणपत जाधव व पुष्पा जाधव,सुनील सासवडे व संगिता सासवडे,मच्छिंद्र रोकडे व मिना रोकडे,बबन विठ्ठल जाधव व अलका जाधव,नवनाथ बढेकर व शोभा बढेकर (सर्व धामणी) या बारा जोडप्यांच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.

खंडेराय,म्हाळसाई,बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी प्रभाकर भगत,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,शांताराम भगत,नामदेव भगत,पांडुरंग भगत,राजेश भगत,अनिरुध्द वाळूंज,बाळशिराम साळगट यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित चंदनाच्या उटीचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडेरायाला पुरणपोळीचा व भजी कुरडईचा नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.

सुवासिक चंदनाचे लेपन करत असताना मंदिराच्या सभामंडपात देवाच्या उटीचे अभंग भक्तीमय वातावरणात गायले जात होते. तर मंदिराच्या आवारात समस्त पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या सनईतून मंगलमय स्वरात भक्तिमय भैरवी गायल्या जात होत्या.अक्षयतृतीयेच्या अभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.

वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात झेंडू,गुलाब,अष्टरच्या फुलांची सजावट धामणीचे भाविक नारायण गणपत जाधव व पुष्पा जाधव यांनी तर मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात आकर्षक विद्युत रोषणाई गुरुकृपा स्पिकरचे प्रथमेश विधाटे व योगेश विधाटे यांच्या सौजन्याने करण्यात आली.

मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महिला भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाला चंदनाची उटी लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला चंदनउटी व भंडारा लावण्यात आला.वासंतिक चंदनउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

वासंतिक चंदनाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शितलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी भाविकांनी सांगितले.चैञ पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे,नगर,नाशिक मुंबई,भोसरी,पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक सहकुटुंब आलेले होते.मंदिराच्या जागरण मंडपात पाच नामाची जागरणाचे घट मांडून वाघे व वीर मंडळी जागरणे करताना दिसत होती.

बहुसंख्य भाविक चारचाकी व दुचाकी वाहनाने येत होते.मंदिराच्या बाहेर तळीभंडार फुल पेढे विक्रीची दुकाने थाटलेली होती. कडक उन्हाच्या तिव्रतेमुळे दुपारनंतर भाविकांची तुरळक ये—जा सुरु होती.अक्षयतृतीयेच्या निमित्ताने रविवारी सकाळपासून घरोघरी देवघरातील खंडोबा म्हाळसाईच्या टाकाच्या पूजेची व पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले.

यावेळी महिलांनी पहाटेपासून घरासमोर दारात सडा टाकून रांगोळ्या काढलेल्या होत्या. धामणी ग्रामस्थांनी ६६ वर्षानंतर खंडोबा देवस्थान मंदिरात चैञ व वैशाख महिण्यात उन्हाळ्यापासून थंडावा मिळावा या भावनेतून प्रथापरंपरेनुसार चंदनउटी लेपन सोहळा सुरु केला असून गुढीपाडवा,चैञ पौर्णिमा व अक्षयतृतीया या तीन सणांच्या दिवशी चंदनउटी सोहळा खंडोबा मंदिरात होतो असे देवस्थानचे सेवेकरी दादाभाऊ भगत यांनी यावेळी सांगितले.


