सामाजिक

धामणीत सोमवतीला सदानंदाचा येळकोट ; हजारो भाविकांनी घेतले कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन !!

1009819842
1009819913

पंचनामा प्रतिनिधी – पुणे,नगर,नाशिक,मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी सोमवतीच्या निमित्ताने शेकडो भाविकांनी गर्दी केलेली होती.

रविवारी (१४जून) दुपारी अमावस्या प्रारंभ होऊन सोमवारी सकाळी नऊपर्यत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने पहाटे चार वाजता शिरुर,आंबेगांव,जुन्नर,खेड तालुक्यातील खंडेरायाच्या सोमवतीचे व मानाच्या काठीचे १४ मानकर्‍यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली.त्यानंतर सकाळी सहा वाजता उगवत्या सूर्याच्या साक्षीने गावातून वाघे व वीर मंडळीनी खंडोबा मंदिरात आणलेल्या पालखीत खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या उत्सवमूर्ती ठेवण्यात येऊन पालखीचे वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर शाहीस्नानासाठी प्रस्थान करण्यात आले.यावेळी भंडारा,खोबरे व फुले उधळून सदानंदाचा येळकोट करण्यात आला.पारंपारिक वाद्याच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत सोमवतीच्या पालखीला सलामी देण्यात आली.

डिसेंबर २०२४ नंतर तिथीचा क्षय झाल्याने जवळजवळ अठरा महिण्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवती अधिक जेष्ठ महिण्यात (पुरुषोत्तम मास) आलेली असल्याने व सोमवतीचा पर्वकाळ सोमवारी सकाळी नऊपर्यत असल्याने या पर्वकाळात उत्सवमूर्तीना शाहीस्नान घालण्यासाठी व पालखी शाही मिरवणूक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केलेली होती.

1009820068

पालखीतून देवाचे मुखवटे सोमवतीच्या स्नानाच्या ओट्यावर आणण्यात आले. सोमवती पालखीचे व मानाचे काठीचे मानकरी नरके,राजगुरु,कांदळकर, गावडे,पडवळ,वायकर, पंचरास,घोडे,बोरचाटे,आवटे,कुरकूटे या आडनावाच्या मंडळीच्या हस्ते मुखवट्याला सुवासिक दवण्याचे अत्तर व गुलाबपाण्याचे मिश्रण करुन चंदनऊटीचा लेप देण्यात आला.त्यानंतर उत्सवमूर्तीना शाहीस्नान घालण्यात आले.

देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,सुभाष तांबे,धोंडीबा भगत,शांताराम भगत,माऊली जाधव वाघे, सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,सुरेश पवार,पांडुरंग भगत,राहूल भगत,राजेश भगत,नामदेव भगत,अनिरुद्ध वाळुंज यांनी खंडेरायाची पूर्वकाळापासून करण्यात येत असलेली पारंपारिक पूजा केली.त्यानंतर आरती झाली.

त्यानंतर सोमवतीचे मानकरी,सेवेकरी,खांदेकरी व खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरुर,पारनेर तालुक्यातील विविध आडनांवाच्या कुळाच्या महिला व पुरुष भाविकांचा भंडार्‍याच्या रंगाची टोपी व पिवळी शाल देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर फुलांची व भंडार्‍याची उधळण करुन पालखीच्या शाही मिरवणूकीला समस्त पंचरास मंडळीच्या हालगी,डफडे,ताशा,संबळ, सनई,शिंगाड तुतारीच्या पारंपारिक वाद्याच्या निनादात दिमाखदार शाही मिरवणूकीला सुरुवात झाली.

1009819838

पालखी मिरवणूकीत भाविकांनी पिवळ्या रंगाची टोप्या परिधान केल्यामुळे त्या लक्ष वेधुन घेत होत्या.धामणीच्या पेठेत मिरवणूकीत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात फुलांची भंडार्‍याची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मिरवणूकीत पालखीच्या पुढे पिंपळवंडी (तालुका जुन्नर) येथील खंडोबाचे वाहन असलेला रुबाबदार सजवलेला अश्व (घोडा) सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

पालखीची शाही मिरवणूक वाजत गाजत दहा वाजता मंदिरात विसावल्यानंतर पालखीतील देवाच्या उत्सवमूर्ती सेवेकरी भगत मंडळीच्या स्वाधीन करण्यात आल्या. सोमवतीला येणार्‍या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने भात,आमटी व बुंदीच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती.दुपारी बारा वाजेपर्यत दोन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे सांगितले.

प्रदीर्घ कालावधीने आलेला सोमवतीचा सोहळा चांगलाच रंगला असल्याचे भाविकांना पाहावयास मिळाले.शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी तळेगांव ढमढेरे.गावडेवाडी.महाळुंगे पडवळ.लांडेवाडी.संविदणे. कवठे.बेल्हा.मरकळ.नांदूर. कूरकूटवाडी.गुंजाळवाडी. पाडळी लोणी.खडकवाडी. पारनेर.भराडी.फाकटे.पाबळ.रानमळा.येथील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

पहाटेपासून दर्शनासाठी भाविक येत होते.दुचाकी चारचाकीने येणार्‍या भाविकांची संख्या मोठी दिसत होती.खोबरे भंडारा विक्रीची व फुलांची पेढ्यांची दुकाने मंदिराबाहेर दिसून आली.मंदिरात पांच नाम जागरण सुरू होती.

1009792054
1009760330
1009760332

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

वळती (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किटमुळे दोन सख्ख्या भावांचे घर जळून झाले खाक !!

Chief Editor

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

Leave a Comment