सामाजिक

खडकवाडीच्या श्री भैरवनाथ मंदिरात नवरात्रोत्सवाचा धार्मिक सोहळा ; घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ; सोंगट्यांच्या पारंपरिक खेळाला शेकडो वर्षांची परंपरा !!

img 20261010 wa0686
1011257709

खडकवाडी : आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी (लोणी-धामणी) येथील ग्रामदैवत व ग्रामस्थांचे कुलदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराज देवस्थानात रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून पारंपरिक नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. ग्रामस्थ, मानकरी, गुरव, सालकरी व दागिनदार यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी घटस्थापना होणार असून, पुढील दहा दिवस मंदिरात सायंकाळी धूपारती, ओलांडा आणि भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला पारंपरिक सारिपाट अर्थात सोंगट्यांचा खेळ. धार्मिक परंपरा, लोकसंस्कृती आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शन या उत्सवातून घडते.

सारिपाटाच्या खेळाला शेकडो वर्षांची परंपरा

नवरात्रोत्सवात श्री भैरवनाथ मंदिरात खेळला जाणारा सारिपाटाचा खेळ पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होते. पुराणपरंपरेत शिव-पार्वती यांच्या खेळाशी जोडला जाणारा हा सोंगट्यांचा खेळ महाभारतातील कथांमधूनही परिचित आहे. पटावरील डाव, हार-जीत आणि प्रतिस्पर्ध्याची चाल रोखण्याचे डावपेच यामुळे या खेळात रंगत निर्माण होते. कधी डाव अत्यंत चुरशीचा झाल्यास हा खेळ रात्रभर सुरू राहतो आणि पहाट कधी होते, हे खेळाडूंनाही समजत नाही.

खडकवाडी, लोणी, रानमळा, वाळुंजनगर आणि पंचक्रोशीतील सोंगट्यांच्या खेळाची आवड असलेले अनेक जण यात सहभागी होतात. तसेच हा पारंपरिक खेळ पाहण्यासाठी धामणी, पोंडेवाडी, वडगाव, मांदळेवाडी, पारगाव, जारकरवाडी, पहाडदरा, शिरदाळे आदी गावांतील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित राहतात. भजन आणि सोंगट्यांचा खेळ खेळण्यासाठी तसेच पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थ व भक्तांकडून चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली जाते. यंदा अष्टमीच्या दिवशी होमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

दसऱ्याला पालखी सोहळ्याची परंपरा

नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेला गावठाणातील पालखी मंदिरातून उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी सकाळी मानकरी मुलखी पाटील यांच्या हस्ते देवाच्या आत्मलिंगाचा अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर दुपारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाथसाहेबांची पालखी मार्गस्थ होते.

जुन्या जाणत्या मंडळींच्या सांगण्यानुसार, पूर्वी यात्रेला आणि दसऱ्याला कन्हेवाडी (ता. खेड) येथील कारभारी कोबल मंडळी पालखीला खांदा लावत असत. पालखीत सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने, शमी अर्थात सौंदड आणि बाजरीची पेंढी ठेवून ती देऊळवाड्यात आणली जाते.

देऊळवाड्यातील ओवरीत पालखी विराजमान झाल्यानंतर पूर्व व दक्षिण द्वारांवरील दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत विराजमान करून पालखी पूर्व द्वारातून बाहेर काढली जाते आणि दक्षिण द्वारासमोरील वडाच्या वृक्षाखाली उभी केली जाते. मानकरी मुलखी पाटील व शिंदेसरकार यांच्या हस्ते शमीपूजन आणि सीमोल्लंघनाचा विधी पार पडतो.

त्यानंतर पालखी पुन्हा देऊळवाड्यातील ओवरीत आणून महाआरती केली जाते. यावेळी मानाचे विडे क्रमाने वाटले जातात. पुढे पालखी गावठाणात नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होते. या वेळी कारभारी धुमाळ बंधू कानिफनाथांची मानाची सासनकाठी घेऊन येतात. सासनकाठी आणि कळस यांची भेट झाल्यानंतर दसरा उत्सवातील महत्त्वाचा धार्मिक टप्पा पूर्ण होतो.

कोजागिरी पौर्णिमेला उत्सवाची सांगता

दसऱ्याच्या रात्री मंदिरात पुन्हा भजन आणि सोंगट्यांचा खेळ रंगतो. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गावठाणातील मंदिरात पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यावेळी नवरात्रोत्सवाची सांगता होते.

श्री भैरवनाथ मंदिरातील हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून, अनेक पिढ्यांपासून जपल्या गेलेल्या परंपरा, लोककला, सामूहिक सहभाग आणि ग्रामसंस्कृतीचा वारसा जतन करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांना श्री भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासह जुन्या परंपरांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

1011251534
1011251237

Related posts

आंबेगाव तालुक्यातील रानमळ्यात बिबट्या वावर ? वनविभागाचे दुर्लक्ष !!

Chief Editor

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा;राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट- -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Chief Editor

धामणीचे सुपुत्र किरण जाधव यांचा नागरी सत्कार ;सैन्यदलातील १७ वर्षांच्या सेवेनंतर मायभूमीत आगमन; ग्रामस्थांकडून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात मिरवणूक !!

Chief Editor

Leave a Comment